सोलापूर – नूतन राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांच्या हस्ते सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील जगजीवन राम झोपडपट्टी परिसरात ३० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन उत्साहात पार पडले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून ही कामे साकारत असून शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या पुढाकारामुळे परिसराच्या सुशोभीकरणाला गती मिळाली आहे.
उद्घाटन प्रसंगी बोलताना खासदार ज्योती वाघमारे म्हणाल्या की, खासदार झाल्यानंतरचे हे त्यांचे पहिलेच उद्घाटन असून या कार्यक्रमाची आठवण आयुष्यभर कायम राहील. “माझा सत्कार विकासकामांच्या माध्यमातून झाला, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे,” असे त्यांनी नमूद केले. मनीष काळजे यांच्या विकासकामांच्या धडाक्याचे त्यांनी कौतुक करत, हा वेग कायम ठेवण्याचे आवाहन केले.
दरम्यान, उद्घाटन प्रसंगी त्यांनी एक भावनिक आठवणही सांगितली. ज्या ठिकाणी सध्या कामे सुरू आहेत, त्याच समोरील शाळेत आपण शिक्षण घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्या शाळेसमोरील रस्त्याचे काम होत असल्याने भविष्यात विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार असून याचा विशेष अभिमान वाटत असल्याचे त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमानंतर शिवसेना भवन, सेवालय सात रस्ता येथे पक्ष पदाधिकाऱ्यांच्या वतीने खासदार वाघमारे यांचा भव दिव्य असा सत्कार करण्यात आला. यावेळी मनीष काळजे यांनी देखील सत्कार संपन्न झाल्यानंतर खा.ज्योती वाघमारे यांच्या विकास कामांची सुरुवात सत्काराने झाली असून सोलापूर शहराच्या विकासासाठी नेहमीच आपण लक्ष द्याल असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमाला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव, जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंबरे पाटील, महिला जिल्हाप्रमुख आरती बसवंती, नूतन नगरसेवक प्रियदर्शन साठे यांच्यासह मनीष काळजे मित्रपरिवार व सेवालाल प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























