भारतीय नौदलाने 28 आणि 29 जानेवारी रोजी अरबी समुद्रात चाच्यांचे दोन मोठे अपहरणाचे प्रयत्न अवघ्या 24 तासांत हाणून पाडले आहेत. भारतीय युद्धनौका आयएनएस- सुमित्राने रविवारी इराणी जहाज एफव्ही इमानला वाचवले. तर दुसऱ्या एका कारवाईत अल नैमी या जहाजाची सोमालियन चाच्यांच्या तावडीतून सुटका केली. या कारवाईत भारतीय सागरी कमांडोने भाग घेतला होता.
संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांकडून प्राप्त माहितीनुसार, केरळच्या कोचीच्या किनाऱ्यापासून 800 मैल दूर अरबी समुद्रात चाच्यांनी इराणचा ध्वज असलेले जहाज आणि त्यातील क्रू सदस्यांना येथे ओलीस ठेवले. यानंतर भारतीय नौदलाने आपली युद्धनौका आयएनएस सुमित्रा पाठवून सर्वांना सुखरूप बाहेर काढले. अधिका-यांनी सांगितले की, जहाजांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भारताने हिंद महासागरात सर्वत्र कडक दक्षता बाळगली आहे.भारतीय नौदलाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की 29 जानेवारी रोजी अल-नईमीच्या सुटकेसाठी ऑपरेशन केले. या जहाजातील सर्व 19 क्रू मेंबर्स पाकिस्तानी नागरिक आहेत. जहाजाला वेढा घातल्यानंतर, मरीन कमांडोजनी ऑपरेशन केले आणि जहाजातून दरोडेखोरांना पिटाळून लावले. याविषयी माहिती देताना नौदलाचे प्रवक्ते कमांडर विवेक मधवाल म्हणाले की, भारतीय नौदलाचा हा प्रयत्न हिंद महासागराचा प्रदेश चाचेगिरीपासून मुक्त करण्याच्या भारताच्या संकल्पाचे प्रतीक आहे.
हिंदी महासागरात भारतीय नौदलाचा दर्जा आणि प्रासंगिकता वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी भारतीय नौदलाच्या युद्धनौकेने 22 भारतीय कर्मचाऱ्यांसह मार्शल बेटांवर व्यावसायिक तेल टँकरला लागलेली आग विझवली. यूएस सेंट्रल कमांडच्या म्हणण्यानुसार, एमव्ही मार्लिन लुआंडा जहाजाला एडनच्या आखातात इराण-समर्थित हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्र हल्ला केला होता. भारतीय नौदलाने 5 जानेवारी रोजी, उत्तर अरबी समुद्रात एमव्ही लीला नॉरफोक या लायबेरियन जहाजाचे अपहरण करण्याचा प्रयत्न हाणून पाडला आणि सर्व क्रू सदस्यांची सुखरूप सुटका केली. गेल्या 23 डिसेंबर रोजी नौदलाने भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर ड्रोन हल्ल्यातून लायबेरियन ध्वजांकित जहाज एमव्ही केम प्लूटोची सुटका केली होती. नौदलाने उत्तर आणि मध्य अरबी समुद्रासह सर्व महत्त्वाच्या सागरी मार्गांचे रक्षण करण्यासाठी जहाजे आणि विमानांची तैनाती वाढवली आहे.