सोलापूर – राज्यात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने सोयाबीनचे दर घसरले जात आहेत. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याने सोयाबीनची खरेदी शासनाने हमीभाव खरेदी केंद्राच्या मार्फत करावी, यासाठी विविध शेतकरी संघटना आग्रही भूमिका घेत असताना, राज्य शासनाने मात्र अद्याप याबाबत कोणताच निर्णय घेतला नसल्याने, सोयाबीन खरेदीसाठी शासनाच्या ग्रीन सिग्नलची वाट पाहिली जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील सोयाबीनच्या खरेदीसाठी हमीभाव खरेदी केंद्राची तयारी पूर्ण झाली आहे.राष्ट्रीय ग्राहक महासंघ यांच्यावतीने हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले जाणार आहे. केवळ शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा पाहिली जात असल्याचे सोलापूर जिल्हा पणन अधिकारी मनोज कुमार बाजपेयी यांनी “दैनिक तरुण भारत”शी बोलताना सांगितले.
दरम्यान, सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात सर्व पूर्व तयारी करण्यात आली आहे. यासंबंधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मीटिंग घेऊन जिल्ह्यातील विविध नऊ खरेदी केंद्राची माहिती घेण्यात आली आहे. खरेदी केलेल्या सोयाबीनच्या साठवणुकीसाठी गोदाम स्वच्छ करणे, आद्रता चेक केल्या जाणाऱ्या मशनरी अद्ययावत करणे, चाळणी यंत्र तयार ठेवणे, केंद्राचे तसेच बाजार समितीचे कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, गतवर्षी प्रमाणे खरेदीचे नियोजन करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या एन. ई. एम.एल. या अधिकृत पोर्टलवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची माहिती भरावयाची आहे. ई पीक पाहणी ॲप आणि एन. इ.एम.एल हे पोर्टल शासनाने लिंक केले आहे. जितके क्षेत्र सोयाबीनच्या लागवडीखाली आहे. त्याची इत्यंभूत माहिती शासनाला याद्वारे मिळणार आहे. त्यानुसारच किती प्रमाणात सोयाबीनची हमीभावाने खरेदी करायची, हे शासन ठरवणार आहे. त्यानुसार सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे. राज्य शासनाच्या नियमानुसार प्रत्येक शेतकऱ्यांचे ठराविक क्विंटल सोयाबीन हे हमीभावाप्रमाणे खरेदी केले जाणार आहे. यामध्ये केंद्राचे तसेच संबंधित बाजार समितीचे कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत.
राज्य शासनाच्या आदेशानंतर हमीभावाने सोयाबीनची खरेदी
सोयाबीनची हमीभाव खरेदी केंद्रातून खरेदीसाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नऊ विविध खरेदी केंद्रांवर पॉस मशीन, संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या एन. ई. एम.एल या अधिकृत पोर्टलद्वारे आपल्या शेताची तसेच सोयाबीनची माहिती अपलोड करायचे आहे. पोर्टलद्वारे प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे. सोयाबीनला राज्य शासनाने ५,३२८ प्रतिक्विंटल असा दर निश्चित केला आहे. केवळ राज्य शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. आदेश आल्यानंतर तात्काळ सोयाबीन हमीभाव खरेदी प्रक्रिया सुरू केली जाईल.
– मनोज कुमार बाजपेयी, जिल्हा पणन अधिकारी सोलापूर
सोलापूर जिल्ह्यात यंदा सोयाबीनचे उत्पादन क्षेत्र वाढले आहे. अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली गेली तर अनेक पिकांचे मोठे नुकसान होऊन महापुरात वाहून गेली. निसर्गाच्या तडाख्यातून वाचलेल्या उर्वरित पिकांना शासनाने हमीभावाने खरेदी करून शेतकऱ्याला दिलासा द्यावा. मात्र राज्यशासन अद्यापही यावर कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने शेतकऱ्यासह संघटना देखील ही प्रमुख मागणी घेऊन अनेक शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.


















