सोलापूर – दि.१६ नोव्हेंबर रोजी सुयश विद्यालय बार्शी या ठिकाणी सीनियर केजीच्या पालकांसाठी संस्थापक शिवदास नलवडे यांच्यावतीने पाल्याचा अभ्यास कसा घ्यावा या विषयीचे सविस्तर ट्रेनिंगचे आयोजन करण्यात आले होते. बदलते शैक्षणिक धोरण तसेच बदलते शैक्षणिक पद्धती या दोन गोष्टींमुळे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवले जाणाऱ्या पद्धती आणि पालकांनी शिक्षण घेतलेल्या पद्धती यामध्ये तफावत असल्याकारणाने विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास करत असताना संभ्रम निर्माण होतो.
हा संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून आणि अध्यापनाच्या पद्धतीत बदल होऊ नये म्हणून सुयशचे संस्थापक नलवडे सर यांनी सिनियर केजीच्या पालकांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित विद्यार्थ्यांना मनोरंजनात्मक माध्यमातून सोपे करुन कशा पद्धतीने शिकवावे याविषयीचे मार्गदर्शन सोबतच विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य कशा पद्धतीने सांभाळता येईल याविषयीचे मार्गदर्शन या एकदिवसीय कार्यशाळेमध्ये सरांनी पालकांना केले.
या कार्यशाळेसाठी माता-पालकांनी मोठ्या संख्येने उत्साहाने हजेरी लावली. या कार्यशाळेमध्ये जवळपास १५० माता-पालक सहभागी झाल्या होत्या. तसेच भविष्यामध्ये ही कार्यशाळा आमच्या व आमच्या पाल्यासाठी खूपच मार्गदर्शक ठरणार असल्याचे मत यावेळी पालकांमधून व्यक्त करण्यात आले.


















