पंढरपूर – सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊन सुद्धा धारावी, मशिदींसारख्या बांधकामांवर हातोडा घालण्याची हिंमत या शासनात नाही.मात्र हे शासन पंढरपुरातील हेरिटेज मठ, मंदिरे, घरेदारे तोडण्याचे प्रकल्प राबविणार हे अत्यंत दुर्दैवी आहे अशी घणाघाती टिका ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र हिंदू महासभेचे कार्याध्यक्ष आनंद दवे यांनी केली.
पंढरपुरात क्रांतिवीर वसंतदादा बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना दवे बोलत होते. क्रांतिवीर वसंतदादा बडवे यांच्या चाळीसाव्या पुण्यस्मरणार्थ हा पुरस्कार दिला गेला.
याप्रसंगी बोलताना श्री.दवे म्हणाले की, विद्यमान सरकारला हिंदुत्वाचा सर्व फायदा पाहिजे आहे परंतु हिंदूंसाठी काही त्याग करायची मात्र इच्छा नाही. त्यांनी मोदी की सौगात यावर ही टीका केली. सरकारने पैसेवाले श्रीमंत मंदिरे ताब्यात घेतली पण जेथे उत्पन्न नाही अशा मंदिरांना मात्र अर्थसहाय्य केले नाही.
याप्रसंगी वसंतदादा बडवे ट्रस्टचे अध्यक्ष व हिंदू महासभा नेते अभयसिंह कुलकर्णी ईचगांवकर यांनी पुरस्कारा मागची भूमिका व क्रांतिवीर दादांची माहिती दिली. ज्या सावरकर पुतळ्यासाठी दादांनी घरदार विकायची तयारी ठेवली तो पुतळा पूर्ण होऊन दादांचा ही पुतळा पंढरीत बसला ही अभूतपूर्व घटना आहे. (कै.) दादांनी आयुष्यभर हिंदुत्वाचे रक्षण केले विठ्ठल मंदिराचे रक्षण केले व मरणोपरांत हे विठ्ठल मंदिराच्या रक्षणासाठीच दादा करेक्ट अँगलला पुतळा रूपाने स्थापित झाले आहेत असेही ईचगावकर म्हणाले.
प्रारंभी विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद वैभव बडवे व महेशाचार्य उत्पात यांनी दिला. माजी नगरसेवक महेश खिस्ते यांनी यापूर्वी दिलेल्या पुरस्कारांचा आढावा घेतला. रामकृष्ण महाराज वीर यांनी दवे यांच्या ब्राह्मण महासंघाच्या कार्याचा गौरव करून मनुस्मृतीप्रमाणे राज्य आले तर ब्राह्मणांनाच जगणे अवघड होईल असे सांगितले.आजवर दवेंनी ब्राह्मण महासंघाद्वारे केलेली कार्ये ही केवळ ब्राह्मण हितासाठी नसून अखिल हिंदूंच्या मानवतेच्या कल्याणासाठीच आहे हे सांगितले. यावेळी श्री.दवे यांचे सहकारी मनोज तारे,पंढरपूरच्या सावरकर क्रांती मंदिराचे अध्यक्ष मोहनराव मंगळवेढेकर यांची ही समायोचित भाषणे झाली.
हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष अनिल पवार यांनी याप्रसंगी कैलासवासी दादांच्या काळातील जुन्या आठवणी सांगितल्या. पुरस्काराचे स्वरूप रोख अकरा हजार रुपये सन्मान चिन्ह कुंडलिनी कृपाण अंकित हिंदुध्वज हार शाल, श्रीफळ असे होते. याप्रसंगी शहर हिंदूसभेचे अध्यक्ष विकासराव मोरे,,माजी नगरसेवक काशिनाथराव थिटे, माऊली महाराज गुरव, क्रांतिवीर दादांचे भाऊ रामसखा बडवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमांसाठी हिंदू सभा भवन मंत्री प्रशांत खंडागळे, विठ्ठलराव बडवे, दीपक कुलकर्णी, महेश काळे यांनी परिश्रम घेतले.