शिवसेनेचे उपनेते आणि २५ वर्षे आमदार राहिलेले बबन शंकर घोलप यांनी आज, गुरुवारी आपल्या ‘शिवसैनिक’ पदाचा राजीनामा देत शिवसेनाला (ठाकरे गट) ‘जय महाराष्ट्र’ केला. स्थानिक राजकारणाच्या नाराजीतून हे सर्व घडल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना ठाकरे गटात प्रवेश देण्यात आला. त्यावरून ते नाराज होते. बबनराव घोलप हे शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. पण आता ही जागा भाऊसाहेब वाकचौरे यांना मिळू शकते. त्यामुळे घोलप यांनी राजीनामा दिला आहे.
निष्ठेने काम केले तरी अपमानित करण्यात आले – बबन घोलप
“मी आज माझ्या शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा देत आहे. कारण आजपर्यंत शिवसैनिक म्हणून मी निष्ठेने व ईमानेईतबारीत काम केले आहे. मला पक्षाने (संघटनेने) जे जे सांगितले, ते प्रामाणिकपणे केले आहे. पण अचानकपणे शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख पदावरून काढून मला अपमानित करण्यात आले. तसेच मी ज्या निष्क्रीय पदाधिकाऱ्यांना काढून टाकले होते व नविन पदाधिकारी नेमले होते. त्यांनाही बदलण्यात आले, हे कितपत बरे आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एकनिष्ठ शिवसैनिक अमर कतारीला कुठच ठेवलं नाही. विशेष म्हणजे ज्या सहा विधानसभा संपर्क प्रमुखांनी लेखी कळवले होते की, हे जुने पदाधिकारी कसे बिनकामाचे विकाऊ आहेत. ते लक्षात येऊन सुध्दा त्यांना परत घेऊन पदे दिली, हे सर्व पाहून मी अचंबित आहे. नेमकं माझं काय चुकलं ते समजलं नाही. मी याबाबत दादही मागितली पण काहीच उत्तरं मिळालं नाही. माझे वकिली करणारेही गप्प आहेत. त्यापेक्षा आपण थांबून घेणे महत्वाचे वाटते, म्हणून मी माझ्या शिवसैनिक पदाचा राजीनामा देत आहे.”
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप हे सर्वांचे लाडके “नाना” म्हणून अधिक परिचित होते.
लहानपणापासून गरिबीचे चटके खाल्ल्याने, सामाजिक झळ पचविल्याने व जगण्यासाठी संघर्ष करत घोलप मोठे झाले. त्यांच्या समाजसेवेमुळेच प्रभावित होऊन बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःहून पत्र पाठवून त्यांना विधानसभेची उमेदवारी देऊ केली. लोकांची सेवा करण्याची एक मोठी संधी त्यांनी राजकारणाच्या माध्यमातून त्यांना मिळाली आणि बबनराव घोलप यांनीही या संधीचं सोनं केलं.
राजकीय कारकीर्द
पाच वेळा आमदार राहिलेल्या घोलप यांची राजकीय कारकीर्द मोठी आहे. बबनराव घोलप हे माजी मंत्री आहेत. देवळाली मतदारसंघात ते पाच वेळा आमदार राहिले आहेत. पहिल्या विधानसभेतच थेट मंत्री म्हणून गळ्यात माळ पडली. मंत्री म्हणून महाराष्ट्रभर दौरा करून आपला समाज एकत्र करणारा करण्याची हातोटी त्यांच्यात आहे.
अन्य योगदान
महिला व बालकल्याण तसेच समाजकल्याण व माजी सैनिकांचे कल्याण अशा खात्यांचा कारभार त्यांनी पाहिला आहे. महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण देऊन स्वतंत्र बजेट मांडले. चीन या देशाच्या बीजिंग येथे अर्थसंकल्प मांडणारे जगातील पहिले मंत्री ठरले. खत्री आयोगाची स्थापना, भटक्या जमातीची अ, ब, क, ड अशी विभागणी करून त्यांना आरक्षणाचा लाभ मिळवून दिले. शासनाच्या माध्यमातून समाजाला ३५० आश्रम शाळा, ३०० वसतिगृहे, ६ सूतगिरण्या व ४०० वृद्धाश्रम दिले.
कला क्षेत्रातही योगदान
राजकारणासोबतच त्यांनी कला क्षेत्रातही योगदान दिलं. घोलप यांनी कितीतरी चित्रपट व नाटकांची निर्मिती त्यांनी केलेली आहे. निलांबरी, शेगावीचा राणा गजानन, मेरी मर्जी, सत्य साईबाबा या चित्रपटाची निर्मिती केली असून, राजा शिव छत्रपती या सह्याद्री वाहिनीवरील प्रदर्शित झालेल्या मालिकेचे देखील निर्माते होते. सेच निलांबरी, अष्टभुजा सप्तशृंगी माता, शेगावीचा राणा गजानन, अत्तराचा फाया, जय वैभव लक्ष्मी माता, वंशवेल, घरंदाज, श्री सत्य साईबाबा, नागराज तुझा भाऊ राया, बाप माणूस, संसार माझा सोन्याचा, विडा एक संघर्ष, शाहू महाराज मालिका अशा अनेक चित्रपटात विविधांगी भूमिका साकारल्या.