महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील कुद्रेमानी ता. बेळगाव येथे २१ जानेवारी रोजी अठरावे मराठी साहित्य संमेलन संपन्न होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी निसर्ग कवी बाबासाहेब सौदागर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
कवी बाबासाहेब सौदागर यांनी शंभर पेक्षा जास्त चित्रपटांसाठी, सत्ताविस मालिकांसाठी गीत लेखन केलेले आहे. त्यांची सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत. बाविस चित्रपटात त्यांनी चरित्र अभिनेता म्हणून काम केले आहे. सध्या त्यांचा माझ्या गाण्याची जन्मकथा हा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे. त्यानी गीतलेखन केलेल्या सत्ताधीश, झुंजार, झुंज एकाकी, राजमाता जिजाऊ, मी सिंधुताई सपकाळ, लग्नाची वरात लंडनच्या घरात, जुगाड, तुझा दुरावा, घुंगराच्या नादात, मध्यम वर्ग, शिवा, इत्यादी चित्रपटातील अनेक गीते लोकप्रिय झालेली आहेत. स्वराज्य रक्षक संभाजी, स्वराज्य जननी जिजामाता, आशा अभिलाषा, या मालिकेतील गीते लोकप्रिय झालेली आहेत. त्यांच्या अनेक लावण्या आणि देशभक्तीपर गाणी लोकप्रिय झाली आहेत.
त्यांनी लेखन केलेलं ‘पायपोळ’ हे मराठा समाजातील पहिले वास्तववादी चित्रण असलेले आत्मचरित्र प्रकाशित झालेले असुन त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘सांजगंध’ ‘पिवळण’ ‘चित्ररंग’ हे कविता संग्रह आणि भंडारभुल हे त्यांचे गाजलेले पुस्तक आहेत.
चित्रपट क्षेत्रातील कविश्रेष्ठ ग.दि. माडगुळकर पुरस्कार, कवीवर्य जगदीश खेबुडकर जीवन गौरव पुरस्कार, कवीवर्य राम उगावकर पुरस्कार हे सन्मान त्यांना मिळालेले आहेत.
भंडारभुल ही कादंबरी विद्यापीठ अभ्यासक्रमात होती. आकाशवाणी दुरदर्शन करीता त्यांनी अनेक गितांचे लेखन केले आहे. आमचा नेता पावरफुल, स्पर्श झाला काळजाला, यावे पुन्हा नव्याने स्वातंत्र्य देवते तु, एन्जॉय करु मस्त एन्जॉय करु, ही त्यांची गाणी जन माणसात अतिशय लोकप्रिय झाली आहेत. आशा भोसले, उषा मंगेशकर, उत्तरा केळकर, वैशाली माडे, साधना सरगम, सुरेश वाडकर, रविंद्र साठे, चंद्रशेखर गाडगीळ, कैलाश खेर, शंकर महादेवन, शान, रुपकुंवर राठोड, या मान्यवर गायक गायिका यांनी त्यांची गाणी गायली आहेत.
मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलन, शब्दगंध चे पहिले साहित्य संमेलन, या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी या पुर्वी भुषविले आहे.