नांदेड / मुखेड – मुखेड नगर परिषद प्रभाग क्रमांक ७ मधून अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी भाजपकडून उमेदवारी द्यावी, अशी मागणी बजरंग दलाचे संयोजक शंकर नाईनवाड यांच्या समर्थकांकडून आ.डॉ.तुषार राठोड यांच्याकडे करण्यात आली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपात उमेदवारीसंदर्भात हालचाली वेगाने सुरू झाल्या असून, याच अनुषंगाने शंकर नाईनवाड यांनी आपल्या सहकार्यांसह आमदार डाॅ. तुषार राठोड यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
या चर्चेत प्रभागातील जनतेच्या समस्या, विकास आराखडे तसेच पक्ष संघटनेच्या बळकटीसंदर्भात मुद्देसूद विचारविनिमय झाला. नाईनवाड यांनी भाजपाच्या विचारसरणीवर विश्वास व्यक्त केला आहे.
हिंदुत्ववादी संघटनांनी देखील नाईनवाड यांच्या उमेदवारीला पाठिंबा देत, पक्षाने त्यांना संधी द्यावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात येत असून, कार्यकर्त्यांमध्ये यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी निवडणुकीत शंकर नाईनवाड हे प्रभाग क्रमांक ७ मधून भाजपाचे प्रबळ दावेदार ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.




















