सोलापूर : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी महापालिका कौन्सिल हॉल इमारतीच्या ठिकाणी असलेल्या मुख्य स्ट्रॉंग रूम मधून विविध ठिकाणच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्ट्रॉंग रूम कडे 3 हजार 494 बॅलेट युनिट आणि 1 हजार 365 कंट्रोल युनिट पोलीस बंदोबस्तात आज पाठवण्यात आले.
सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवार दि. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची जय्यत तयारी महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे. सोलापूर शहरात विविध सात निवडणूक निर्णय अधिकारी अंतर्गत विविध सात ठिकाणी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. सोलापूर महापालिका आवारातील कौन्सिल हॉल इमारतीच्या खालील मुख्य स्ट्रॉंग रूम मधून बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट अशी यंत्रणा आज दिवसभरात विविध निवडणूक निर्णय अधिकारी स्ट्रॉंग रूम कडे पाठविण्यात आले आहेत. सोलापूर शहरातील वेलणकर हॉल दयानंद कॉलेज, सिंहगड कॉलेज, शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर, कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय इमारत, विलासचंद मेहता माध्यमिक प्रशाला, नर्सरी फुलपाखरू कलादालन नूतन मराठी विद्यालय, शहीद राहुल शिंदे बहुउद्देशीय सभागृह, एसआरपीएफ कॅम्प येथील ईव्हीएम स्ट्रॉंग रूम कडे हे बॅलेट व कंट्रोल युनिट हे ट्रक मधून पाठविण्यात आले, अशी माहिती नियंत्रण अधिकारी तपन डंके यांनी दिली.
विविध निवडणूक निर्णय अधिकारी स्ट्रॉंग रूम कडे पाठविलेले अनुक्रमे बॅलेट आणि कंट्रोल युनिट या प्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी (आरओ) क्रमांक एक येथे 500 बॅलेट युनिट 200 कंट्रोल युनिट, आरओ 2 – 570 /210, आरओ 3 – 438 /189, आरओ 4 – 393/197,
आरओ 5 – 555/200, आरओ – 6 – 363/149,
आरओ 7 – 675/220 युनिट असे एकूण 3 हजार 494 बॅलेट युनिट आणि 1 हजार 365 कंट्रोल युनिट पोलीस बंदोबस्तात पाठविण्यात आले आहेत. त्या त्या ठिकाणच्या स्ट्रॉंग रूममध्ये हे युनिट्स ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर 14 जानेवारी रोजी संबंधित मतदान केंद्रावर पाठविण्यात येतील.
हे सर्व युनिट्स सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्यासह रवाना करण्यात आले आहेत. महापालिकेतील हे युनिट 70 मजुरांच्या सहकार्यातून ट्रक मध्ये ठेवण्यात आले. उपअभियंता तपन डंके यांच्या नियंत्रणाखाली कर्मचारी व संबंधित अधिकाऱ्यांनी मोजून व तपासणी करून हे युनिट्स वितरित केले.


















