सोलापूर – बालरंगभूमी परिषदेच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने ‘जल्लोष लोककलेचा’ या भव्य लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बाल व किशोरवयीन कलाकारांमधील अभिनय, गायन, नृत्य आणि इतर कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या लोककला प्रकारांची ओळख करून देण्यासाठी हा महोत्सव एक हक्काचं व्यासपीठ ठरत आहे. यंदाचे हे महोत्सवाचे दुसरे वर्ष आहे, ज्यामध्ये सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील बालकलाकार सहभागी होणार आहेत.
महोत्सवाचे स्वरूप:
हा महोत्सव एकूण पाच लोककला प्रकारांमध्ये होणार आहे यात एकल गायन, एकल नृत्य, एकल वाद्य, समूह गायन, समूह नृत्य समावेश आहे.
स्पर्धा सर्वांसाठी विनामूल्य आहे. स्पर्धकांना अनामत रक्कम एकल स्पर्धेसाठी रु.२००/- सांघिक संघासाठी रु.५००/- (रिफंडेबल डिपॉझिट) भरायची आहे जी स्पर्धेनंतर परत मिळणार आहे. स्पर्धेच्या भव्यतेमुळे अंतिम फेरीपूर्वी दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०-३० वा. चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला, वॉटर फ्रंटमागे, सोलापूर येथे प्राथमिक फेरी आयोजित करण्यात आली आहे.
यातून अंतिम स्पर्धेसाठी बालकलाकारांची निवड केली जाईल. अंतिम स्पर्धा – महोत्सव: दि. १० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वा. मुळे हॉल, हरीभाई देवकरण प्रशाला, सोलापूर येथे अंतिम स्पर्धा आणि महोत्सवाचा कार्यक्रम रंगणार आहे.
या महोत्सवाच्या माध्यमातून मुलांना महाराष्ट्रातील लोककला प्रकारांची माहिती व्हावी, त्याचा आनंद घेता यावा आणि लोककला प्रकारांचा प्रचार व प्रसार व्हावा हा मुख्य उद्देश आहे, असे आयोजकांनी सांगितले. बालरंगभूमी परिषद, सोलापूर जिल्हा शाखेच्या अध्यक्षा सीमा श्रीगोंदेकर-यलगुलवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा, नाट्य संस्था आणि बाल कलाकारांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शाळांनी व पालकांनी दिलेल्या गुगल फॉर्म लिंक – क्यू.आर. कोड स्कॅन करून ऑनलाईन फॉर्म भरून सहभाग निश्चित करावा. अधिक माहितीसाठी संपर्क:
समिती प्रमुख सुभाष माने ८१४९८३१३१४,
अर्चना अडसूळ – ७३८५१९८३७४ किंवा
अन्नपूर्णा साखरे –८६९८५४००७० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष सीमा यलगुलवार यांनी केले आहे.