अहिल्यानगर : व्यक्ती हा जन्मतः गुन्हेगार नसतो, तर परिस्थिती किंवा क्षणिक रागामुळे त्याच्या हातून गुन्हा घडतो. त्यामुळे कारागृहातील बंद्यांनी भूतकाळातील चुका विसरून, स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवत ‘वाल्याचा वाल्मिकी’ बनावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने, अहिल्यानगर जिल्हा कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री. घार्गे बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर, नायब तहसीलदार मयूर बेरड, प्रमुख वक्ते ॲड. सुनील मुंदडा, कारागृह अधीक्षक एस. पी. कवार, तुरुंगाधिकारी अरुण मदने आदी उपस्थित होते.
बंदीजनांच्या मनात जीवनाप्रति सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने कारागृह प्रशासनाकडून नियमितपणे विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून मानवी हक्क दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस अधीक्षक श्री. घार्गे पुढे म्हणाले , अनावधानाने किंवा परिस्थितीमुळे कारागृहात यावे लागले तरी, येथील वास्तव्याचा उपयोग स्वतःच्या सुधारणेसाठी करावा. गुन्हेगारी प्रवृत्ती सोडून देऊन मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निश्चय प्रत्येकाने करावा.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांनी प्राधिकरणातर्फे दिल्या जाणाऱ्या ‘मोफत विधी सेवे’ची माहिती दिली. आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही बंदी न्यायापासून वंचित राहू नये, यासाठी विधी सेवा प्राधिकरण कटिबद्ध असून, बंद्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ॲड. सुनील मुंदडा यांनी ‘मानवी हक्क’ या विषयावर सविस्तर विवेचन केले. संयुक्त राष्ट्रांनी मानवी हक्कांचा जाहीरनामा केव्हा स्वीकृत केला आणि भारतात मानवी हक्क कायद्याची अंमलबजावणी कशी व केव्हापासून सुरू झाली, याविषयी त्यांनी उपस्थितांना ऐतिहासिक व कायदेशीर माहिती दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिश्रक श्रीमती हर्षल रेळे, सुभेदार हिराचंद ओंबासे, गणेश बेरड, सुनील विधाते यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कारागृह अधीक्षक एस. पी. कवार यांनी केले.
























