मुंबई – मुंबई म्हणजे मायानगरी! जिथं दररोज हजारोंचा लोंढा आपली स्वप्नं घेऊन दाखल होतो. काहींची स्वप्नं खरी होतात, तर काही निराशेच्या गर्तेत हरवतात. पण या चकचकीत शहरात एका बांगलादेशी तृतीयपंथीयानं बनावट कागदपत्रांच्या जोरावर कोट्यवधींचं साम्राज्य उभारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘ज्योती’ उर्फ ‘गुरू माँ’ (खरं नाव बाबू अयान खान) ही गेल्या 3 दशकापासून देशाच्या आर्थिक राजधानीत अवैधपणे वास्तव्य करत होती. या कालावधीत तिने एक, दोन नाहीतर तब्बल 20 फ्लॅट्स, दुकानं आणि बरीच माया जमवल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) तपासातून समोर आली आहे.सध्या ती अटक असून तिच्याकडून आणखी महत्वपूर्ण माहिती उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात आली.
ज्योतीनं पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद सीमेवरून भारतात अवैध प्रवेश केला होता.. मुंबईत बस्तान बसवल्यानंतर तिनं तृतीयपंथी समुदायात ‘गुरू माँ’ म्हणून लौकिक मिळवला. 300 हून अधिक अनुयायी तिच्या घरी धार्मिक विधी आणि आशीर्वादासाठी येत. बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि जन्म प्रमाणपत्राच्या आधारे तिनं मुंबईत आपलं साम्राज्य उभारलं. मार्च 2025 मध्ये तिला पहिल्यांदा ताब्यात घेण्यात आलं होतं, पण बनावट कागदपत्रं दाखवून ती सुटली. ऑक्टोबर 2025 मध्ये या कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर ती घुसखोर असल्याचं उघड झाले
कोट्यवधींची माया आणि काळे कारनामे : ज्योतीकडे मुंबईतील रफीक नगर, गोवंडी यांसारख्या भागांत 20 हून अधिक जंगम मालमत्ता असल्याचं उघड झालं आहे. यात फ्लॅट्स, दुकानं आणि झोपडपट्टीतील जागांचा समावेश असून, त्यांची किंमत कोट्यवधी रुपये आहे. तिनं काही मोकळ्या जागा आणि झोपडपट्टीतील जागांवर अतिक्रमण करून 200 हून अधिक घरं ताब्यात घेतली. ही घरं भाड्यानं देऊन दरमहा लाखोंची कमाई सुरू होती. इतकंच नव्हे, तर 200 हून अधिक बांगलादेशी नागरिकांना भारतात अवैधपणे आणण्यात तिचा सहभाग असल्याचंही तपासात समोर आलं आहे. हे स्थलांतरित कोलकात्यात 4-5 दिवस ठेवून बनावट कागदपत्रं तयार करून मुंबईत आणले जात होते. शिवाजी नगरातील खोल्यांमध्ये ठेवून 5 ते 10 हजार रुपये भाडं आकारलं जाई. यातील काहींना जबरदस्तीनं वेश्या व्यवसायासाठीदेखील पाठवलं जाई, अशी माहिती समोर आली आहे. ज्योतीविरोधात पासपोर्ट अधिनियम 1950, परदेश आदेश 1948, 1946 आणि भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात बनावट कागदपत्रं, फसवणूक, भारतात अवैध वास्तव्य आणि मानवी तस्करीसारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे. यापूर्वी शिवाजी नगर, नारपोली, देवनार, ट्रॉम्बे आणि कुर्ला पोलीस ठाण्यांत हाणामारीचे आणि सार्वजनिक उपद्रवासंबंधीचे 5 गुन्हे तिच्यावर दाखल असल्याची माहिती सांगण्यात आली.