बार्शी – दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तहसील कार्यालय, बार्शी नगरपरिषद, शहर पोलीस ठाणे, तालुका पोलीस ठाणे या शासकीय कार्यालयामध्ये शहर तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. तहसील कार्यालय येथे बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन तहसीलदार एफ.आर. शेख, निवासी नायब तहसीलदार सुभाष बदे, ज्येष्ठ पत्रकार एन. आर. कुलकर्णी व बी.के. गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वृत्तपत्र पत्रकारांसह साप्ताहिक संघटना, डिजिटल मीडिया आणि युट्युब चॅनेलचे पत्रकार उपस्थित होते.
शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय बाळासाहेब जाधव, उपनिरीक्षक मागणे यांनी पत्रकारांचा सन्मान केला. तर तालुका पोलीस ठाण्यात देखील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांनी पत्रकारांनी बातमीदारी करत असताना स्वतःच्या जीवाची, आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. पत्रकारांनी आहार आणि व्यायामावर लक्ष द्यावे, असे आवाहनही दिलीप ढेरे यांनी यावेळी पत्रकारांना केले.
शहरातील सोजर शिक्षण संस्था, लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था, श्री रेणुकामाता मल्टीस्टेट पतसंस्था व ओमराजे अरबी मल्टी सटी निधी लि. यांच्यावतीने देखील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

















