सोलापूर – शहरातील खड्ड्यांचा सिलसिला काही केल्या थांबत नाही. बाजार समिती चौकात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, जड वाहतुकीमुळे निष्पाप जीवाचा बळी जात आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी याच खड्ड्यामुळे पवनचक्की घेऊन जाणारा महाकाय ५६ चाकी ट्रक उलटला. सुदैवाने यामध्ये कोणतेही जीवितहानी झाली नाही. मात्र खड्ड्यांचे वाढते प्रमाण यामुळे बाजार समिती चौक अपघात प्रवणक्षेत्र बनत आहे. याकडे महापालिका प्रशासनासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देखील गांभीर्याने पाहणे गरजेचे बनले आहे.
दरम्यान, या चौकातून हैदराबाद तसेच विजापूर रोडकडे जाणारी जड वाहतूक कायम आहे. त्याचप्रमाणे हैदराबाद आणि पुणे मार्गावर जाणाऱ्या अवजड ट्रकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. सततच्या होणाऱ्या जडवाहतुकीने रस्ते खराब होत आहेत. अशातच पाऊस पडल्याने त्या खड्ड्यात पाणी साचून रात्री अपरात्री खड्ड्याचा अंदाज न येता होणाऱ्या अपघाताचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत आहे. बाजार समिती चौकात नव्याने होत असलेल्या उड्डाणपूलाचे कामकाज देखील सुरू आहे. त्यामुळे वळणावर रस्ता अरुंद झाल्याने समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही. यामुळे देखील वाहतुकीचे प्रश्न निर्माण होत आहेत.
बाजार समितीमध्ये विविध शेतमाल घेऊन येणारे अवजड ट्रक यांची संख्या देखील दिवसाकाठी मोठ्या प्रमाणात आहे. छोट्या मोठ्या ट्रकांची रात्रंदिवस रहदारी या रस्त्यावरून सुरूच आहे. त्यामुळे रस्त्याची गुणवत्ता खालावत चाललेली आहे. सातत्याने वाहतूक होऊन खड्डे वाढत आहेत. मात्र वाढलेले खड्डे बुजवण्यात प्रशासन असमर्थ दिसत आहे. खड्डा बुजवण्याच्या नावाखाली केवळ दिखावा केला जातो. रस्ता बनवताना निकृष्ट दर्जाचा कच्चामाल वापरल्याने बुजवलेले खड्डे पुन्हा उघड्यावर येतात. यामुळे देखील अपघाताचे चक्र कायम राहिल्याचे दिसून येत आहे. स्थानिक नागरिक आणि किरकोळ विक्रेत्यांनी प्रशासनावर नियोजन शून्य कारभाराचे खापर फोडले आहे. पोलीस प्रशासन वाहतूक सुरळीत करण्यात व्यस्त असते. मात्र महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या शासकीय संस्थेने रस्त्याची डागडुजी किंवा दुबारडांबरीकरण करणे गरजेचे असताना, देखील तसे होताना दिसत नसल्याची ओरड स्थानिकांमधून ऐकण्यास मिळत आहे.
हैदराबादकडे जाणाऱ्या वाहनांना बाह्यवळण द्यावे.
सोलापूर शहरातून होणारी जड वाहतूक बंद व्हावी. मार्केटमध्ये येणारे तसेच विजापूर ते हैदराबाद असे जाणारे अवजड ट्रक यांना पर्यायी बाह्यवळण द्यावे. शहरातील वाढते अपघात आणि रस्त्यांची होत असलेली दुर्दशा यामुळे थांबणार आहेत. दररोज मोठ्या प्रमाणात प्रकारांची रांग येथे लागत असल्याने आम्हाला रस्त्यावरून ये – जा करताना जीव मुठीत धरून जावे लागते.
– फारूक सय्यद, विक्रेते
बाजार समिती करणार पत्रव्यवहार
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील चौकात मोठ्या प्रमाणात खड्डे वाढलेले आहेत. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. बाजार समिती अंतर्गत रस्ते आमच्या अधिकार क्षेत्रात येतात. बाजार समितीच्या बाहेरील रस्ते महापालिका आणि महामार्ग प्राधिकरण यांच्या अधिकार क्षेत्राकडे येतात. त्यामुळे संबंधित यंत्रणाकडे यासंबंधी पत्रव्यवहार करू.
– अतुल सिंग राजपूत, प्रभारी सचिव बाजार समिती सोलापूर

















