आतापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या यशामध्ये अनेकांनी अडथळा टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु मी संयम ठेवल्यामुळे यशस्वी झालो आहे, असं दावा करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. ते म्हणाले की, सध्या राज्यामध्ये अतिशय किळसवाणी राजकारण सुरू आहे आणि यातून राज्यातील जनतेला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18 वा वर्धापन दिन नाशिकमधील दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी अमित ठाकरे, ज्येष्ठ नेते बाळ नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, नाशिकचे संपर्क नेते एड.किशोर शिंदे,प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम, सलीम मामा शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, दिलीप दातीर, प्रदेश सरचिटणीस तथा माजी महापौर अशोक भाऊ मुर्तडक आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सोशल मीडियाचा वापर हा कशा पद्धतीप्रमाणे करावा हे चर्चासत्र झाले. त्या चर्चासत्राचा धागा पकडून ते म्हणाले की, आज राज्याचे राजकारण अतिशय किळीसवाणं झालं आहे. कोण कुठे आहे, कोण काय करतो, हेच समजत नाही. मला दुसऱ्याचा मुल खेळवण्यामध्ये आनंद नाही, मला स्वतःचाच मुल खेळवायचा आहे आणि ते मी खेळणार, असा विश्वास देत कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितले की, आज राज्यामध्ये जे चालू आहे ते चुकीच्या पद्धतीप्रमाणे चालू आहे. त्यामुळे महाराष्ट्राची प्रगती खुंटली आहे. आता महाराष्ट्राच्या प्रगतीकडे लक्ष दिले पाहिजे, सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची प्रगती केली, तर महाराष्ट्रामध्ये शिक्षण, रोजगार हा सहज उपलब्ध होऊ शकतो परंतु त्यावर कोणालाही रस नाही.
आजपर्यंत अठरा वर्षांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेक चढ-उतार बघितले. विशेष करून उतार जास्त पाहिले असे सांगून पुढे म्हणाले की, राजकारणामध्ये संयम ठेवला पाहिजे संयम ठेवला म्हणजे यश नक्कीच मिळतं असा माझा अनुभव आहे. आजपर्यंत नेहमीच संयम ठेवला म्हणून प्रगती केली आहे, असे स्पष्ट करत ते म्हणाले की, लगेच कोणालाही यश मिळत नाही. आज भाजपा किंवा मोदी यशस्वी झाले आहेत, तर त्या पाठीमागे अनेक वर्षांची तपश्चर्या आहे. विशेष करून आडवाणी, अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांसारख्या काही नेत्यांची मोठी तपश्चर्या आहे. 1950 मध्ये सुरू झालेला जनसंघ हा 1980 झाली भाजपा म्हणून पुढे आला. पण या तपश्चर्यानंतर आज सत्ता मिळाली आहे. ही सत्ता मिळवताना काही प्रमाणात मोदींचाही वाटा असेल, परंतु यापूर्वी जे कष्ट घेतले गेले, त्याचेच आज फळ आहे. मी पण म्हणजेच आपला पक्ष येणाऱ्या काळामध्ये यशस्वी होईल आणि त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करत आहे, करत राहील आणि एक दिवस यशस्वी होईल, असा विश्वास देऊन ते म्हणाले सर्वांनी संयम ठेवला आणि एक संघ राहिलं तर तो दिवस लांब नसेल.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कधीही कोणतेही आंदोलन हे अपूर्ण सोडले नाही. मनसेच्या आंदोलनाला अनेक यश मिळालेले आहेत आणि ते पूर्णपणे केलेले आहेत. परंतु विरोधक अपप्रचार करीत आहेत उलट विरोधकांनीच अनेक आंदोलन सुरू केली त्याचा शेवट घातला नाही, मध्येच ते आंदोलन अर्धवट सोडली, असा विरोधकांना चिमटा काढत आणि कोणाचे नाव न घेता राज ठाकरे म्हणाले की, कार्यकर्त्यांनी यावर नागरिकांचे प्रबोधन केलं पाहिजे, सोशल मीडियाच्या माध्यमातून मनसेची भूमिका ही नागरिकांपर्यंत पोचली पाहिजे असे आवाहन केले.
आपल्या भाषणामध्ये शरद पवार यांच्यावरती देखील टीका केली. शरद पवार आणि अजित पवार हे सर्वांनाच उल्लू बनवत आहेत. राज्यामध्ये जे गलिच्छ राजकारण चालू आहे ते थांबविण्यासाठी आता नागरिकांनीच पुढे आले पाहिजे. देशामध्ये तीनच पक्ष खऱ्या अर्थाने काम करत आहेत. त्यामध्ये भाजप, दुसरे म्हणजे शिवसेना आणि तिसरे म्हणजे मनसे या तीन पक्षांनी देशाच्या आणि राज्याच्या भल्यासाठी काम केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
भोग्याचा प्रश्नांवरून उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधत राज ठाकरे यांनी सांगितले की, आमच्या कार्यकर्त्यांवर विनाकारण गुन्हे दाखल केले काहीच कारण नव्हते आणि आता तर आमच्या हातात सत्ता आली की आम्ही लगेचच भोगे बंद करणार यात आता कोणतीही शंका घेण्याचे कारण नाही. माझा कोणत्या धर्माला विरोध आहे असे नाही पण ज्या पद्धतीप्रमाणे इतरांना त्रास होतो. त्याचा विचार कोणीतरी करावा, सरकार काय करत सरकारने यावर निर्णय घेणे अपेक्षित होतं. पण सरकार देखील पळपुटं ठरलं आणि आत्ताच सरकार काहीच करायला तयार नाही. असे सांगून ते म्हणाले की मी माझ्या पक्षामध्ये जात-पात हे पाळत नाही कोणी खालचा कोणी वरचा हे ठरवण्याचा अधिकार कोणी दिला सर्वजण एकसारखे आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपला वर्धापन दिवस हा मुंबई बाहेर वेगवेगळे शहरांमध्ये साजरा करत आहे. यावर्षी नाशिकमध्ये साजरा केला असल्याचा आनंद होत असल्याचे सांगून ते म्हणाले की, यापुढे राज्यातल्या वेगवेगळ्या शहरात वर्धापन दिन हा साजरा केला जाणार आहे.