तभा फ्लॅश न्यूज/ विलास येडगे : नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यातील प्रेक्षणीय व नयनरम्य नर – मादी धबधबा ओसंडुन वाहण्यास सुरुवात झाली आहे. नर – मादी धबधबा ओसंडुन वाहत असतांना पाहणे म्हणजे डोळ्याचे पारणे फेडुन घेण्यासारखे आहे. नर – मादी धबधबा ओसंडुन वाहत असल्याने येणाऱ्या काळात या धबधब्याचे अप्रतिम सौंदर्य न्याहळण्यास पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या चार पाच दिवसांपासुन बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यामुळे बोरी धरण 100 टक्के भरून धरणाचा सांडवा सुरु झाला आहे. धरणाचा सांडवा सुरु झाल्यामुळे सांडव्यातील पाणी बोरी नदीत जात असल्यामुळे बोरी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे त्यामुळे नदीच्या शेवटच्या टोकाला असणारे ऐतिहासिक किल्ल्यातील शिलक धबधब्यासह पर्यटकांचे सर्वाधिक आकर्षण असणारे किल्ल्यातील प्रेक्षणीय व नयनरम्य नर – मादी धबधबा ओसंडुन वाहण्यास सुरुवात झाली आहे.
नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यातील नर – मादी तसेच शिलक धबधबे पुर्वीपासुन प्रसिद्ध आहेत. हे धबधबे सुरु झाल्यानंतर दरवर्षी किल्ल्यात लाखो पर्यटक हजेरी लावतात.
महाराष्ट्रातील प्रेक्षणीय किल्ल्यापैकी एक म्हणुन नळदुर्ग तेथील भुईकोट किल्ल्याकडे पाहिले जाते. इ.स. 1351 ते 1486 या कालावधीत नळदुर्ग व परीसरात बहामणी चालुक्य यांची सत्ता होती. त्यानंतर 1558 मध्ये इब्राहिम अली आदिलशहा यांनी, 126 एकराच्या क्षेत्रावर किल्ल्याची बांधणी केली. नळदुर्गच्या किल्ल्याची अनेक वैशिष्ट्ये असुन किल्ल्यात टेहळणी बुरुज (उपली बुरुज) रंगमहाल, नऊबुरुज, गणपती महाल श्री खंडोबा मंदिर, जामा मशिद, पाणी महाल, बारादरी, नर – मादी धबधबा व शिलक धबधबा हे पर्यटकांचे खास आकर्षण आहे. महाराष्ट्रासह परराज्यातुन पर्यटक हा किल्ला पाहण्यासाठी येतात.
किल्ल्यातील नर – मादी धबधब्याची बांधणी हा स्थापत्य कलेचा उत्तम नमुना असुन बोरी धरणातुन येणारे नदीचे पाणीउत्तरेच्या बाजुने किल्ल्यात वाहत येते. या पाण्याला चंद्रकोरीचा आकार देऊन पुन्हा उत्तरेकडे वळविले आहे. बोरी नदीच्या शेवटच्या टोकाला पुर्व – पश्चिम असा बंधारा अतिशय कल्पकतेने व भक्कम तऱ्हेने बांधला आहे. बंधाऱ्याच्या वरच्या बाजुला नदीचे पुराचे पाणी वाहुन जावे म्हणुन दोन भले मोठे सांडवे तयार करण्यात आले आहेत. या दोन सांडव्यानाच नर व मादी अशी नावे देण्यात आली आहेत.
यालाच नर – मादी धबधबा असे म्हणतात. नर – मादी धबधबा सुरु झाल्यानंतर धबधब्यातील पाणी 100 फुट खाली फेसाळत जाऊन आदळते. हा क्षण पाहण्यासाठीच पर्यटक हा धबधबा सुरु होण्याची आतुरतेने वाट पाहतात. दि. 14 ऑगस्ट रोजी नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यातील प्रेक्षणीय व नयनरम्य नर – मादी तसेच शिलक हे दोन्ही धबधबा ओसंडुन वाहण्यास सुरुवात झाली आहे.