सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या विश्वस्त व पदाधिकाऱ्यांनी सोलापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसर तसेच नार्थकोट मैदान येथील नियोजित संविधान भवन परिसराची पाहणी केली.
यापूर्वी महामंडळाच्या वतीने महापौर विनायक कोंडयाल यांना 14 मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले होते. त्यानंतर हे पाहणी करण्यात आली. भीम जयंती निमित्त पुतळा परिसर व मागील नियोजित संविधान भवन (नार्थकोट मैदान) परिसरात आवश्यक ती कामे करण्याची सूचना केली. पुतळा परिसर व सम्राट अशोक स्तंभ परिसराचे सुशोभीकरण, मंडप व प्रकाशयोजना, पुतळ्याचे रंगकाम, नामफलक दुरुस्ती, पिण्याच्या पाण्यासाठी आरओ मशीन दुरुस्ती किंवा नवीन बसविणे, ग्रील गेट व पायऱ्यांची दुरुस्ती, तसेच फोकस लाईट सुरू करण्याच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. पुतळ्याच्या मागील नियोजित संविधान भवनासाठी असलेल्या सुमारे एक एकर जागेवर स्वच्छता मोहीम राबविणे, कंपाऊंड वॉल रंगकाम, स्लोगन दुरुस्ती, काटेरी झुडपे हटविणे, नवीन बोरवेल उभारणे, रोड रोलिंग करणे व कट्टा उभारण्याबाबतही सूचना करण्यात आल्या.
यावेळी विश्वस्त समिती अध्यक्ष आनंद चंदनशिवे, विश्वस्त बाळासाहेब वाघमारे, विभागीय कार्यालय क्रमांकचे अधिकारी लोखंडे, अवेक्षक राहुल कांबळे, अवेक्षक कदम , उद्यान प्रमुख स्वप्निल सोनलकर, आरोग्य निरीक्षक सिंधीबंदी, सुनिल कांबळे तसेच बबन शिंदे, विकी शेंडगे, अॅड. विशाल मस्के, गौतम शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

























