बेंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) स्फोट घडवणारा आरोपी आणि सूत्रधाराला अटक केली आहे. दोन्ही आरोपींना पश्चिम बंगालमधून ताब्यात घेण्यात आले. अब्दुल मतीन ताहा आणि मुसावीर शाजिब हुसेन अशी तपास यंत्रणेने पकडलेल्या 2 आरोपींची नावे आहेत.
एनआयएने यापूर्वी हा स्फोट घडवणाऱ्या मुख्य आरोपी मुसावीर शाजिब हुसेनची ओळख पटवली होती. या प्रकरणातील आणखी एक सूत्रधार अब्दुल मतीन ताहा याचीही ओळख पटली, जो इतर प्रकरणांमध्येही एनआयएला हवा होता. एनआयएच्या पथकांनी कर्नाटकातील 12, तामिळनाडूतील 5 आणि उत्तर प्रदेशातील एका ठिकाणासह एकूण 18 ठिकाणी कारवाई केली होती. यावेळी स्फोटात सहभागी असलेल्या मुजम्मिल शरीफ याला ताब्यात घेण्यात आले. एनआयएने 3 मार्च रोजी या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे घेतली होती. एनआयएने काही दिवसांपूर्वी एक प्रेस रिलीझ जारी केले होते, ज्यामध्ये हा स्फोट कोणी घडवून आणला हे सांगण्यात आले होते.
बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये 1 मार्च 2024 रोजी स्फोट झाला. या स्फोटात 9 जण जखमी झाले होते. कॅफेमध्ये आयईडी बॉम्बस्फोट टायमर वापरून करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले होते. स्फोटानंतर महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर मोठ्या थाटामाटात कॅफे पुन्हा सुरू करण्यात आला. ग्राहकांची तपासणी करण्यासाठी कॅफेच्या प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर लावण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. प्रवेशास परवानगी देण्यापूर्वी कर्मचारी प्रत्येक ग्राहकाची हँडहेल्ड डिटेक्टरसह तपासणी करतील. सर्व ग्राहकांवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल आणि कर्मचारी कोणत्याही संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवतील असा सांगण्यात आलेय.