धाराशीव / वाशी – वाशी तालुक्यातील तांदळवाडी येथील भैरवनाथ शुगर मिल्स लिमिटेडच्या १२ व्या गळीत हंगामाच्या मोळीपूजन सोहळ्याचा कार्यक्रम शेतकरी आणि मान्यवरांच्या उत्साही उपस्थितीत पार पडला. कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत, व्हाईस चेअरमन केशव उर्फ विक्रम सावंत तसेच संचालक मंडळाच्या उपस्थितीत मोळीचे विधिवत पूजन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान बोलताना व्हाईस चेअरमन केशव उर्फ विक्रम सावंत म्हणाले की आमदार तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ शुगर मिल्स नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य देते. याही वर्षी आमदार सावंत इतर कारखान्यांपेक्षा अधिक दर जाहीर करून शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवतील अशी ग्वाही त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले की भैरवनाथ शुगर मिल्सकडे यावर्षी मोठ्या प्रमाणात यंत्रणा सज्ज असून कार्यक्षेत्रातील एकाही शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही. मागील अनेक वर्षांपासून कारखान्याचा कारभार शिस्तबद्धपणे सुरू असल्याने शेतकरी समाधानी आहेत.
या मोळीपूजन सोहळ्याला कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत, व्हाईस चेअरमन केशव उर्फ विक्रम सावंत, शिवसेना वाशी तालुकाप्रमुख सत्यवान गपाट, निश्चित चेडे, नागनाथ नाईकवाडी, प्रसाद जोशी, युवासेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब मांगले, शिवहर स्वामी, शिवसेना उपतालुकाप्रमुख विकास तळेकर, युवासेना तालुकाप्रमुख प्रवीण गायकवाड, दिनकर शिंदे, अतुल चौधरी, अशोक लाखे, उद्धव साळवी तसेच कारखान्याचे संचालक मंडळ, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
 
	    	 
                                




















 
                