हिंगोली : शहरात आज दि. ०३ नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पक्षातर्फे जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेला राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
ही सभा शहरातील मोंढा मैदानावर आज (०३ नोव्हेंबर) रोजी सकाळी ११.०० वाजता पार पडणार आहे. या जनसंवाद सभेला राज्यसभेचे विद्यमान खा. डॉ. अजित गोपछडे, विभागीय संघटनमंत्री संजय कौडगे, आ. जितेश अंतापूरकर, आ. भिमराव केराम, आ. तुषार राठोड, आ. राजेश पवार, आ. श्रीजयाताई चव्हाण, माजी आमदार अमरनाथ राजूरकर, भाजपा जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ही जनसंवाद सभा पक्षाची ध्येय-धोरणे, जनतेच्या अपेक्षा, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणार आहे. देगलूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार या सभेत जाहीर होण्याची दाट शक्यता असल्याने नागरीकांत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच प्रतिस्पर्धी पक्षाच्या नेत्यांची नजर सुध्दा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या घोषणेकडे लागली आहे. या सभेतून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार घोषित केले जाणार की उमेदवार म्हणून चित्र स्पष्ट होणार, हे या सभेनंतरच कळेल.
या जनसंवाद सभेत पक्षाच्या आगामी रणनितीबाबत मार्गदर्शन, स्थानिक प्रश्नांवरील चर्चा तसेच कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याचे सांगण्यात येते. याप्रसंगी देगलूर शहर व ग्रामीण भारतीय जनता पक्षाच्या वतीने सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.























