तभा फ्लॅश न्यूज/किनवट : किनवट व परिसरात झालेल्या ढगफुटी सदृष्य पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांवर मोठे अस्मानी संकट कोसळले आहे. निसर्गाच्या या प्रचंड तडाख्यामुळे शेतमाल, घरे व इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर किनवट माहुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भिमरावजी केराम यांनी पूरग्रस्त गावांचा दौरा करुन परिस्थितीचा आढावा घेतला.
या पाहणी दौऱ्यात त्यांनी पिंपरी, भंडारवाडी, कोपरा, बोधडी व पार्डी, कोपरा या गावांना भेट देऊन पूरग्रस्त शेती, घरे तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या समवेत तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर, माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष दिनकर दहिफळे, जिल्हा उपाध्यक्ष संदिप केंद्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य भागवान हुरदुके, मुसा खान, बाजार समितीचे संचालक श्रीराम कांदे, विवेक केंद्रे, कपिलकुमार कांबळे, तसेच संबंधित गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.
या दौऱ्यात आमदार भीमरावजी केराम यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. पूरामुळे झालेले शेतीचे नुकसान, घरांची झालेली हानी तसेच गावातील रस्ते व पूल यासंदर्भातील समस्या ऐकून घेतल्या. यावेळी आमदार केराम यांनी त्वरित रस्ते व पूल दुरुस्तीसाठी आवश्यक त्या सूचना दिल्या.