भोकर विधानसभेसाठी शेतकऱ्यांच्या 75 कोटीवर डल्ला?
शेतकरी संघटनेचा अशोक चव्हाणवर घणाघात
मुदखेड ता प्र
भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांची केवळ 2500 रु बोळवन करून प्रतिटन 100 ते 135 रु वाहतूक खर्चात बेकायदेशीर वाढ करून शेताकऱ्यांच्या घामाच्या 75 कोटीवर थेट डल्ला मारुन तो पैसा येत्या भोकर विधानसभा निवडणुकीत वापरला जाणार आहे का? असा थेट सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे यांनी केला असून खा. अशोक चव्हाण यांच्यावर घणाघात साधला आहे.
भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने 2023-24 वर्षातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केवळ प्रतिटन 2500 रु एफआरपी देऊन वाहतूक खर्चात अधिकची बेकायदेशीर वाढ दाखवली असल्याने शेतकऱ्यांच्या प्रति टन 100 ते 135 रुपयांना म्हणजेच जवळपास हक्काच्या 75 कोटी रुपयांना कारखान्याने ‘कोयता’ लावला असून या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी प्रादेशिक सहसंचालकाकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
लवकरच भोकर मतदारसंघात निवडणुका असल्याने साम, दाम, दंड, भेद वापरून मुदखेड पॅटर्न राबवण्याचा मानसूबा तर यामागे नाही ना? तसेच शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार तर नव्हे ना असे प्रश्न राजेगोरे यांनी उपस्थित केले आहेत. या हनुमंतराव राजेंगोरे यांनी दिलेल्या निवेदनावर शेतकरी संघटनेचे रावसाहेब अडकीने, किशनराव कदम, हरिभाऊ कदम यांच्या स्वाक्षरी आहेत. या दरम्यान मराठवाड्यात माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वात जास्त प्रतिटन 2738 रु इतका उच्चांकी भाव देऊन शेतकऱ्यांच्या प्रति आस्था दाखवली आहे.
—-प्रतिक्रिया—–
भाऊराव चव्हाण कारखान्याने बेकायदेशीर वाहतूक खर्च दाखवून शेतकऱ्यांच्या हक्काच्या 75 कोटी रुपयांवर डल्ला मारून भोकर विधानसभा निवडणुकीत हा पैसा वापरला जाणार आहे का?
हनुमंत राजेगोरे
जिल्हाध्यक्ष, हनुमंत राजेगोरे