सोलापूर – बाजार समिती सेस रद्द करा, या प्रमुख मागण्यासह इतर ७ मागण्यांसाठी भुसार आडत व्यापारी संघाच्या वतीने आज शुक्रवार (दि.५) डिसेंबर रोजी एक दिवसाचा लाक्षणिक व्यापार बंद पुकारण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीतर्फे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समिती संदर्भातील समस्या बाबत हा बंद पुकारला असल्याचे सांगण्यात आले.
या बंदमध्ये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भुसार आडत व्यापारी महासंघाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी सहभागी होऊन व्यापार बंद ठेवला. एरव्ही बाजार समितीच्या आवारात ट्रकांची गर्दी असायची, खरेदीदार व्यापारी यांचा राबता असायचा, परंतु आज लाक्षणिक बंदमुळे बाजार समितीच्या भुसार विभागात सर्वत्र शुकशुकाट पहावयास मिळाला. एक दिवसाच्या या लाक्षणिक बंदमुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची सुमारे पाच कोटींची उलाढाल ठप्प झाली.
दरम्यान, सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास भुसार आडत व्यापारी महासंघाच्या कार्यालयासमोर सोलापूर भुसार आडत व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत व्यापारी एकजुटीचा विजय असो.. आमच्या मागण्या मान्य करा..याघोषणाबाजी करत सरकारचे लक्ष वेधले. या लाक्षणिक बंद आंदोलनात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एक हजार व्यापारी सहभागी झाले होते. भुसार बाजार पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्यामुळे शेतमाल विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी व्यापाऱ्यांनी याआधीच त्यांना शेतमाल विक्रीसाठी आणू नये असे कळवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. एका दिवसात तब्बल ५ कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होईल, असे भुसार आडत व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश चिक्कळी यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यात एकूण १२ बाजार समित्या आहेत. या सर्व बाजार समित्यांमध्ये आज बंद पाळण्यात आला आहे. भुसार अडत विभागात सकाळी बंद पाळल्यानंतर दुपारी ५० पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. या बंदमध्ये दाळ मिल असोसिएशन, ऑईल मिल असोसिएशन, बारदाना असोसिएशन, किराणा व मसाला असोसिएशन, दलाल असोसिएशन या संघटना सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे बाजार समितीत असणारे अन्नधान्य व कडधान्याचे सर्व प्रकारचे होलसेल किरकोळ दुकाने बंद होती. फळे व भाजीपाला व्यापारी संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मात्र नाशवंत शेतमाल खराब होईल, यासाठी त्यांनी बाजारपेठ सुरू ठेवण्याचे सांगितले.
यावेळी अध्यक्ष सुरेश चिक्कळी,उपाध्यक्ष अशोक संकलेचा, संचालक तथा सेक्रेटरी वैभव बरबडे, खजिनदार गुरुशांत ढंगे, सल्लागार समिती सदस्य तुकाराम काळे, प्रभाकर विभुते, संगमेश्वर रघोजी, प्रकाश हत्ती, बसवेश्वर इटकळे, वस्तीमल संकलेचा, मल्लिनाथ स्वामी, महादेव मठपती, राजानंद शिंदे, गुरुशांतप्पा परमशेट्टी, रहीम मैंदर्गीकर, पशुपतीनाथ माशाळ, शिवानंद उपासे, प्रविण नष्टे, आशिष दुलंगे, सिध्दाराम उमदी आदींसह पदाधिकारी सदस्य आणि व्यापारी वर्ग उपस्थित होते.
कोट
सोमवार दि.८ डिसेंबर रोजी बैठक त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार
सोलापूर बाजार समितीमधील सेसची जाचक अट रद्द करा यासह इतर नऊ मागण्यासाठी संघटनांचे व्यापारी या आंदोलनात सहभागी झाले होते. यापूर्वी राज्य शासनाने सेस ( बाजार फी) रद्द करण्यासंबंधी शासन निर्णय जाहीर केला होता. परंतु महाराष्ट्र फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी हा शासन निर्णय रद्द करण्यास शासनास भाग पाडले. त्यामुळे काढण्यात आलेला शासन निर्णय तात्काळ रद्द झाला. या जाचक अटीमुळे अनेकांचे नुकसान होत आहे. त्याचा परिणाम व्यापारावर होत आहे. या लाक्षणिक बंदनंतर आमच्या मागण्यांची दखल शासनाने घेतली आहे. सोमवार (दि.८) डिसेंबर रोजी यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. शासनाचे काही प्रमुख अधिकारी तसेच पुण्यातील वरिष्ठ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये ही बैठक संपन्न होणार आहे. त्या बैठकीनंतरच आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदनही देणार आहोत.
– सुरेश चिक्कळी, अध्यक्ष, भुसार व आडत व्यापारी संघ सोलापूर.
कोट
फेडरेशनच्या दबावापोटी काढण्यात आलेला शासन निर्णय रद्द
महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीतर्फे पुणे येथे झालेल्या व्यापारी परिषदेत (दि.५) डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील व्यापार बंद ठेवण्याचा आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार (दि.२८) नोव्हेंबर रोजी मार्केट यार्ड सोलापूर येथील श्री भुसार आडत व्यापारी संघ व भुसार विभागातील संलग्नित संघटनांचे जनरल सभा घेऊन शिखर संघटनेच्या आदेशानुसार शुक्रवार (दि. ५) रोजी लाक्षणिक बंद ठेवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला होता. या बंदच्या माध्यमातून आमच्या मागण्याकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. यापूर्वी शेतमालाच्या व्यवहारावर शेकडा एक रुपये प्रमाणे सेस (बाजार फी) मार्केट कमिटीच्या वतीने आकारण्यात येते. हा सेस राज्य सरकारने रद्द केला होता. तसा शासन निर्णय देखील काढला होता. परंतु त्यानंतर फेडरेशनच्या दबावापोटी राज्य सरकारने सेस एक रुपये ऐवजी शेकडा ५ पैसे ते २५ पैसे इतके केले. त्यानंतर दर तीन वर्षांना परवाना नूतनीकरणाची फी भरली जाते. यामुळे व्यापारी वर्गावर अतिरिक्त ताण पडत आहे. त्याचा परिणाम देखील भाव भाववाढीमध्ये होत आहे.
– बसवराज ईटकळे, संचालक भुसार व आडत व्यापारी संघ सोलापूर.
चौकट
संघटनेच्या प्रमुख मागण्या
१) अन्नधान्य व खाद्यान्न वस्तूंवर ५% जीएसटी लागू झालेला आहे व त्याचे राजस्व राज्य शासनाला मिळत आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती कर (सेस) रद्द करावा.
२) दिनांक २६/८/२०२४ रोजी तात्कालीन उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत झालेल्या चर्चेमध्ये अनिर्णित विषयांवर पुन्हा त्वरित मीटिंग घेऊन निर्णय घेण्यात यावे.
३) राष्ट्रीय बाजार समिती बाबत शासनाने प्रस्तावित केलेल्या अध्यादेशामध्ये त्रुटी दूर करण्याबाबत कृती समिती बरोबर त्वरित चर्चा करण्यात यावी.
४) कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कायद्यामधील बदलाबाबत कृती समितीतर्फे यापूर्वी सुचविण्यात आलेल्या बदलांबाबत कृती समिती बरोबर चर्चा करून निर्णय घ्यावेत.
५) अन्नसुरक्षा व मानदे कायद्यामधील जाचक तरतुदी रद्द कराव्यात. अनुचित कारवाईस प्रतिबंध करावा.
६) यापूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीचे परवाने ऑनलाईन उपलब्ध करून द्यावेत. अन्यथा महाराष्ट्रातील व्यापारी परवाने नूतनीकरण करणार नाहीत.
फोटो ओळ – सेस रद्द करा या मागणीसाठी भुसार आडत व्यापारी संघाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या एक दिवसीय लाक्षणिक बंदमध्ये सहभागी झालेले व्यापारी वर्ग तर दुसऱ्या छायाचित्रात बाजारपेठेतील दुकाने बंद असलेले दिसून येत आहेत.


















