सोलापूर : भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर, येथील प्राध्यापक इंजि. सौरभ अनिल देशमाने यांनी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत “Design of Wireless Sensor Node for IOT Device” या विषयावर पेटंट प्राप्त केले आहे. या यशामुळे संस्थेच्या शैक्षणिक व संशोधन परंपरेत आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे.
इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) तंत्रज्ञानाच्या झपाट्याने वाढणाऱ्या वापराच्या पार्श्वभूमीवर वायरलेस सेन्सर नोडची कार्यक्षम रचना अत्यंत महत्त्वाची ठरते. इंजि. सौरभ देशमाने यांनी विकसित केलेल्या या डिझाइनमध्ये कमी ऊर्जा वापर, अचूक डेटा संकलन आणि सुरक्षित वायरलेस कम्युनिकेशन यावर विशेष भर देण्यात आला आहे. औद्योगिक क्षेत्र, स्मार्ट शेती, आरोग्य सेवा तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
या संशोधनामुळे IoT उपकरणांची कार्यक्षमता आणि विश्वासार्हता वाढण्यास मदत होणार असून, कमी खर्चात अधिक परिणामकारक डेटा ट्रान्सफर करणे शक्य होईल. भविष्यातील डिजिटल आणि ऑटोमेशन क्षेत्रासाठी हे पेटंट महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
महाविद्यालयाचे अध्यक्ष इंजि. रवींद्रजी गायकवाड यांनी प्राध्यापक सौरभ देशमाने यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “आमच्या संस्थेतील प्राध्यापक संशोधन आणि नवोपक्रमात आघाडीवर आहेत, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. अशा कार्यामुळे विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळते.”
संस्थेच्या सचिव सौ. अनामिका गायकवाड यांनीही त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल देशमाने यांनी सौरभ देशमाने यांचे विशेष कौतुक करत संशोधनवृत्ती जोपासणाऱ्या प्राध्यापकांचे अभिनंदन केले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकवृंद यांनीही त्यांना शुभेच्छा देत अभिनंदन व्यक्त केले.
या यशामुळे महाविद्यालयाची संशोधन परंपरा अधिक दृढ झाली असून, आगामी काळात आणखी नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि पेटंट्स साकार करण्याचा संस्थेचा संकल्प आहे.


























