नागपूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपा व शिवसेना शिंदे गटाचे मंत्री, आमदारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला रविवारी सकाळी भेट दिली.सरसंघचालकांच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन केले. दरवर्षीच्या प्रथा परंपरेनेनुसार, विधिमंडळच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर शहरात येणारे भाजपा आणि शिवसेनचे आमदार, मंत्री, मुख्यमंत्री आणि पदाधिकारी आवर्जुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर दर्शन व संघाचे बौद्धिक ज्ञान प्राप्त करतात. यंदा मात्र बौद्धिक सत्र भरवण्यात आले नाही.
आज रेशीमबागच्या स्मृती मंदिरात गेल्यानंतर सर्वांनी सरसंघचालकांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे समाधीस्थळी नतमस्तक झाले. सर्व नेत्यांनी सरसंघचालकांच्या समाधीचं दर्शन घेतले. त्यानंतर महर्षी व्यास सभागृहाच्या खाली तळमजल्यात असलेल्या हॉलमध्ये सर्वांचा चहापान कार्यक्रम झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनी एकत्रित कॉफी घेतली. कॉफी घेतल्यानंतर दोघंही सोबतच बाहेर आले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदुत्ववादी विचारधारेवर आधारित संघटना आहे, तर शिवसेनाही प्रखर हिंदुत्वाचा विचार मांडणारा पक्ष असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुंबईत अनेकदा संघाच्या शाखेत हजेरी लावून त्यानंतर शिवसेनेच्या शाखेत सहभागी होणारे अनेक शिवसैनिक असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळं गेल्या शंभर वर्षांत संघानं केलेलं कार्य समजून घेण्यासाठी जगभरातून लोक रेशीमबाग स्मृतीभवन इथे येत असतात. आमदार, मंत्री आणि विविध क्षेत्रातील व्यक्ती राजकारणाची आणि संघाच्या कार्यपद्धतीची माहिती घेण्यासाठी येतात, अशी माहिती भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
संघाच्या स्मृती भवन परिसरात येण्याचा आनंद काही वेगळाच आहे. महायुती सरकारमधील आमदार येऊन संघाचा विचार घेऊन जातात. असे विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.


























