सोलापूर – महापालिका पंचवार्षिक सर्वत्रिक निवडणूकीचे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला धक्का बसला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत अलिप्त असणारे प्रथमेश कोठे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजप पक्षात प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई प्रदेश कार्यालयात प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपचा शेला घालून सर्वांचे स्वागत केले.
आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर तात्काळ पक्षीय राजकारण बदलत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रथमेश कोठे यांच्या भाजप प्रवेशानंतर राजकारणाची समीकरणे बदलणार आहेत. स्व. महेश कोठे यांच्या गटाचा प्रथमेश कोठे यांच्या नेतृत्वात भाजप प्रवेश झाल्याने भाजपची ताकद सोलापूर शहरात वाढणार आहे. माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्यासह स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल, माजी नगरसेविका कुमुद अंकाराम, माजी नगरसेवक विठ्ठल कोटा, माजी नगरसेवक शशिकांत कैंची, जोशी समाज शहर अध्यक्ष युवराज सरवदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय वाकसे, राष्ट्रवादी युवकचे शहर उत्तर सरचिटणीस तुषार पवार, संतोष सोमा, आकाश भोसले आदींचा भाजपा प्रवेश संपन्न झाला.
प्रथमेश कोठे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल.




















