भाजप कार्यकर्त्यांनी पुढचे 100 दिवस नव्या ऊर्जेने काम कारावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केले. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात आज, रविवारी कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते.
याप्रसंगी पंतप्रधान म्हणाले की, ‘मी येथे उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. भाजप कार्यकर्ते वर्षातील प्रत्येक दिवशी, 24 तास देशाची सेवा करण्यासाठी काहीतरी करत राहतात. पण आता पुढचे 100 दिवस नव्या ऊर्जेने, नव्या उमेदीने, नव्या आत्मविश्वासाने काम करायचे आहे. प्रत्येक नवीन मतदार, प्रत्येक लाभार्थी, प्रत्येक वर्ग, समाज, पंथ, परंपरा या सर्वांपर्यंत पोहोचावे आणि सर्वांचा विश्वास संपादन करावा. सर्वांनी प्रयत्न केल्यावर भाजपला जास्तीत जास्त जागा मिळून आणखी देशसेवा करता येईल. गेल्या 10 वर्षांत देसात जी काही कामे झाली, ती मैलाचा दगड आहेत. अजून देशासाठी खूप काही साध्य करायची स्वप्ने आणि निर्णय बाकी आहेत. मी पहिला पंतप्रधान आहे ज्याने लाल किल्ल्यावरुन देशातील शौचालयांवर भाष्य केले, महिलांच्या बाजूने बोललो, देशात विश्वकर्मा योजना सुरू केली. शतकानुशतके प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्याचे धाडस दाखवले. अयोध्येत भव्य राम मंदिर बांधून 5 शतकांची प्रतीक्षा संपवली. गुजरातमधील पावागडमध्ये 500 वर्षांनंतर धार्मिक ध्वज फडकवण्यात आला. 7 दशकांनंतर आम्ही करतारपूर साहिब महामार्ग खुला केला आहे. 7 दशकांच्या प्रतीक्षेनंतर देशाला कलम 370 मधून स्वातंत्र्य मिळाले आहे.
गेल्या 10 वर्षात भारताने जी गती गाठली, मोठी उद्दिष्टे साध्य करण्याचे धाडस दाखवले, ते अभूतपूर्व आहेत. भारताने प्रत्येक क्षेत्रात जी उंची गाठली, त्याचा प्रत्येक देशवासीयाला एकत्र केले. आता देश ना छोटी स्वप्ने पाहतो ना छोटे संकल्प करतो. आता देशाची स्वप्नेही मोठी असतील आणि संकल्पही प्रचंड असतील. हाच विकसित भारताचा संकल्प आहे. आज विरोधी पक्षाचे नेतेही एनडीए सरकार 400 पारच्या घोषणा देत आहेत. एनडीएला 400 चा टप्पा पार करण्यासाठी भाजपला 370 चा टप्पा पार करावा लागेल, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
आम्ही छत्रपती शिवरायांना मानणारे लोक आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्यांनी सत्तेचा उपभोग न घेता आपले ध्येय चालू ठेवले. त्याचप्रमाणे सरकार आपले ध्येय गाठण्यावर लक्ष देत आहे. आज भाजप युवा शक्ती, महिला शक्ती, गरीब आणि शेतकऱ्यांची शक्ती घडवण्याचे काम करत आहे. ज्यांना कुणीच विचारले नाही, त्यांना आम्ही विचारले अन् जवळ केले. येणाऱ्या काळात देशातील महिलांना संधी मिळतील. मिशन शक्ती देशातील महिला शक्तीच्या संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी एक संपूर्ण परिसंस्था निर्माण करेल. तब्बल 15 हजार महिला बचत गटांना ड्रोन मिळेल, ज्याद्वारे ड्रोन दीदी शेतीत वैज्ञानिकता आणि आधुनिकता आणतील. देशातील 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे कामही सरकार करत असल्याचे त्यांनी सांगितले.