सोलापूर – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन संचालक मंडळाची यापुढील सुनावणी आता लातूर जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे याप्रकरणी पुढील कार्यवाही निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक लातूर यांच्याकडे होणार आहे. त्यामुळे सोलापूर बाजार समितीच्या नूतन संचालक मंडळाचे लक्ष लातूरकडे लागून राहिलेले आहे.
दरम्यान, बाजार समितीची पंचवार्षिक निवडणुक होण्यापुर्वी तक्रारदार तथा याचिकाकर्ते मिलिंद मऱ्याप्पा मुळे यांनी जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी, पणन संचालक यांच्याकडे महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समिती (समितीची निवडणुक) नियम २०१७ मधील कलम २७ (१) प्रमाणे एकूण १५ उमेदवाराविरुध्द अपील दाखल केले होते. परंतु सदरचे अपील पणन संचालक पुणे यांनी फेटाळल्यानंतर याचिकाकर्ते मिलिंद मुळे व राहुल बनसोडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याची सुनावणी (दि. २४) एप्रिल रोजी उच्च न्यायालयाचे न्यायाधिश अमित बोरकर यांच्यासमोर झाली होती. त्यानंतर हे प्रकरण जिल्हा उपनिबंधक कार्यालय धाराशिव यांच्याकडे वर्ग करण्यात आले होते. परंतु आता या प्रकरणाला नवे वळण आले आहे. सोलापूर बाजार समितीच्या नूतन संचालकांची सुनावणी यापुढे आता लातूर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे होणार आहे. अशी माहिती तक्रारदार मिलिंद मुळे यांनी पत्रकाद्वारे कळवली आहे.
सदरची सुनावणीमध्ये याचिकाकर्त्यांना स्वातंत्र्य देऊन जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे निवडणुक याचिका दाखल करण्याचे निर्देश दिलेले होते. त्याप्रमाणे याचिकाकर्ते मिलिंद मुळे यांनी उदय उर्फ रेवणसिध्द चंद्रकांत पाटील, दिलीप ब्रम्हदेव माने, नागप्पा म्हाळप्पा बनसोडे, प्रथमेश वसंत पाटील, राजशेखर विरुपाक्षप्पा शिवदारे, सुरेश सिद्रामप्पा हासापुरे, श्रीशैल बसवेश्वर नरोळे हे सहकारी संस्था सर्वसाधारण निवडुन आलेले आहेत. महिला राखीव मधून निवडुन आलेले इंदुमती परामानंद अलगोंडा, अनिता केदार विभुते व सहकारी संस्था इतर मागासवर्गीयमध्ये अविनाश श्रीधर मार्तंडे तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती मधील सुभाष रामचंद्र पाटोळे, तसेच आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातून निवडुन आलेले सुनिल ब्रम्हानंद कळके, तसेच राहुल रमेश बनसोडे यांनी श्री चाँदा गफार जब्बार असे एकूण १३ संचालकांच्या विरुध्द महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समिती (समितीची निवडणुक) नियम २०१७. मधील नियम ७२ (अ) प्रमाणे जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी सोलापूर यांच्याकडे अपील अर्ज दाखल केला होता.




















