नागपुरातील गणेशपेठ परिसरातील राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती बस स्थानकात आज, बुधवारी बॉम्बसदृष्य बॉक्स आढळल्याने एकच खळबळ उडाली. बॉम्ब स्कॉडने सदर बॉक्स हस्तगत केला असून तपासणीसाठी सुराबर्डी परिसरात नेला आहे. सदर वस्तू बॉम्ब असण्याची शक्यता वर्तवली जातेय.
यासंदर्भातील माहितीनुसार गडचिरोली येथून (एमएच-40 वाय 5097) क्रमांकाची बस 1 फेब्रुवारी रोजी नागपुरात आली होती. तसेच ही बस सावनेरला देखील गेली होती. त्यानंतर ही बस मंगळवारी मेन्टेनन्ससाठी बस डेपोत आणण्यात आली. यावेळी मेकॅनिकला यात संशयास्पद बॉक्स आढळून आला. या बॉक्सला वात असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. त्यानंतर याबाबत गणेशपेठ पोलिसांना सूचना देण्यात आली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह बॉम्ब स्कॉड बस स्थानक परिसरात दाखल झाले. या बॉक्सची तपासणी केली असता त्यामध्ये बॉम्बमध्ये असलेला घटक आढळून आलेत. त्यानंतर पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी संबंध बॉक्स सुरक्षितपणे हाताळत आपल्या ताब्यात घेतला. दरम्यान एक तास चाललेल्या कारवाईनंतर अखेर ‘ती बस’ पथकाने ताब्यात घेतली. बसमधील बॉक्समध्ये बॉम्बसदृश वस्तू हस्तगत केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान हा बॉक्स बॉम्ब असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. हा संशयित बॉक्स सुराबर्डी परिसरात पुढील तपासणीसाठी नेण्यात असल्याची माहिती डीसीपी गोरख भामरे यांनी दिली.


















