सोलापूर – सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये दिवाळीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. दिवाळी सण दृष्टिक्षेपात आला असून आबालावृद्ध दिवाळीची आतुरतेने वाट पाहत आहेत. याचप्रकाशमान दिवाळीचा पर्व वसुबारस याने सुरू होत असून दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पद्मशाली समाजात बोम्मारिल्लू (घरकुल) सजविण्याची परंपरा आजही कायम आहे. विशेषतः पद्मशाली समाज बांधवांकडे दरवर्षी नवीन बोम्मारीलू खरेदी केला जातो. याच परंपरेच्या अनुषंगाने शहरातील पूर्वभागांसह गेंट्याल चौकात मुस्लिम कारागीर गेल्या अनेक वर्षांपासून बोमारिल्लू बनवत आहेत. नजीर शेख ( मिस्त्री) आपल्या दोन्ही मुलांसह या कामात व्यस्त असतात. त्यांच्याकडे दिवाळीच्या सहा महिने अगोदर पासून याचे कामकाज सुरू होते. देवदार, फाईन लाकडांपासून बोम्मारिल्लू साकारले जाते. त्यावर सन्माईक लावल्याने बोम्मारिल्लू आकर्षक दिसतात.
दरम्यान, पद्मशाली समाजामध्ये बोमारिल्लू ( घरकुल) मांडून खेळण्याची परंपरा आजच्या घडीला देखील कायम असून लहान मुलींना यामधून संसाराची आवड निर्माण व्हावी हाच मागचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात येते. हुबेहूब एखाद्या बंगल्यासारखेच हे घरकुल ३ बाय ३, ३ बाय ३.५ आणि २ बाय २ अशा आकारात बनविले जातात. या बोम्मारिल्लूची किंमत सुमारे एक हजार रुपये पासून पाच हजार रुपयांपर्यंत आहे.

बोम्मारिल्लू (घरकुल) याची ग्राहकांमधून मागणी वाढत असून यंदाच्या वर्षी दरामध्ये थोड्या प्रमाणात भाववाढ झाली आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये असणारे विविध साहित्य छोटे आकारात बनवण्यात आले आहेत. त्यामध्ये डायनिंग टेबल, किचन, ड्रेसिंग टेबल, कपाट, सोफासेट, पाळणा, लिव्हिंग रूम, आदींसारखे छोटेखाणी खेळणी ग्राहकांसाठी लक्षवेधी ठरत आहेत.
बोम्मारिल्लू वर्षानुवर्षे परंपरा कायम.
बोमारिल्लू (घरकुल) याची परंपरा आजतागायत कायम असून सर्वत्र दिवाळीचा हा सण बोमारिल्लूच्या माध्यमातून आनंदात साजरा केला जातो. दरवर्षी नव्या पद्धतीचे बोम्मारिल्लू खरेदी करून त्यावर छोटेखानी संसार मांडून मुलींना त्याची माहिती दिली जाते. नजीर मिस्त्री यांच्याकडे नवनवीन छोटेखाणी त्यांनी साहित्य चांगल्या किमतीत मिळते. त्यामुळे दरवर्षी आम्ही येथे खरेदी करतो.
– लक्ष्मी मेरगु, ग्राहक
बोम्मारिल्लू बनवण्यातून आत्मिक समाधान मिळते.
ग्राहकांचा विश्वास असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून बोम्मारिल्लू बनवत आहेत. यंदाच्या वर्षी हैदराबाद बेंगलोर मुंबई भिवंडी येथे बोम्मारिल्लू पाठवण्यात आले. देवदार फाईन लाकडांपासून बोम्मारिल्लू बनवले जातात. सहा महिने दरवाजे खिडक्यांची कामे करतो. दिवाळीच्या सहा महिन्या अगोदर बोम्मारिल्लू बनवण्याचे कामकाज सुरू होते. पद्मशाली समाजामधून याला विशेष मागणी आहे. मी स्वतः त्यानंतर माझे दोन मुले अल्लाउद्दीन आणि सैफअली दोघेही हे काम करतात. पैसे मिळवण्यापेक्षा एक आत्मिक समाधान या पारंपारिक बोम्मारिल्लू बनवण्यातून आम्हाला प्राप्त होते.
– नजीर शेख ( मिस्त्री ), बोम्मारिल्लू कारागीर