माहूर / नांदेड – स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड कडून माहूर तालुक्यातील पाचोंदा शिवारात २० नोव्हें. रोजी दोन महिलांचा गळा दाबून खून करून दागिने लुटणाऱ्या घटनेचा पर्दाफाश केला असून, अवघ्या १२ तासांत दोन्ही आरोपींना पकडण्यात यश प्राप्त करत माहूर पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.याबाबत गु.र.न. १९१/२०२५ कलम १०३(१), ३११, ३०९(६) भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहूर तालुक्यातील पाचोंदा येथील शेतात कापूस वेचणीसाठी गेलेल्या अंतकलाबाई अशोक अडागळे (55) व अनुसयाबाई साहेबराव अडागळे (50) या दोन्ही महिलांचा अज्ञात व्यक्तींनी २० नोव्हेंबर रोजी गळा दाबून खून केला होता. त्यानंतर त्यांच्या अंगावरील सोन्याचे व चांदीचे दागिने लुटून आरोपी फरार झाले होते.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक (नांदेड) सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे, माहूर चे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे आणि सिंदखेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर यांनी घटनास्थळी भेट देत तातडीने तपास पथके नेमून स्थानिक गुन्हे शाखेच्या चार विशेष पथकांना अदिलाबाद, यवतमाळ, माहूर व किनवट येथे शोध मोहीमेसाठी पाठविले. संशयित आरोपींचे स्केच पुण्यातील तज्ञांमार्फत व्हिडिओ कॉलिंगद्वारे तयार करण्यात आले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक रवि वाहुळे यांना 21 नोव्हें रोजी गोपनीय सूत्रांकडून अशी माहिती मिळाली की, मुख्य संशयित दत्ता सुरेश लिंगलवार (38, रा. सदोबा सावळी, ता. आर्णी, जि. यवतमाळ) हा माहूर तालुक्यातील करंजी परिसरातील नातेवाईकाच्या शेतातील आखाड्यावर लपून बसला आहे.त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून दत्ता लिंगलवार याला पकडले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत आपल्या साथीदाराचे नाव गजानन गंगाराम येरजवार (41, रा. गंगाजीनगर, करंजी) असे सांगितले.
दत्ता याच्या सांगण्यावरून पोलिसांनी दुसरा आरोपी गजानन येरजवार यालाही घरातून ताब्यात घेतले. दोघांकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व दोन मोबाईल जप्त करण्यात आले.
गुन्हा उघडकीस आणण्यात उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा नांदेड तसेच त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. यवतमाळ पोलीसांनीही तपासात मोलाचे सहकार्य केले.ही संयुक्त आणि वेगवान कारवाई पाहता पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सर्व पथकांचे विशेष कौतुक केले आहे. दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी माहूर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.


















