सोलापूर : औषधांना दाद न देणाऱ्या क्षयरोग (MDR-TB) रुग्णांसाठी ‘BPaLM’ ही आधुनिक औषधोपचार प्रणाली सोलापूरमध्ये प्रभावी ठरत आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या शहर क्षयरोग केंद्रामार्फत जून २०२५ पासून ही प्रणाली राबवली जात असून सध्या १६ रुग्ण उपचाराखाली आहेत. यापैकी ४ रुग्णांनी उपचार यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. या यशस्वी अंमलबजावणीबद्दल आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
महानगरपालिकेकडे उपलब्ध NAAT तपासणी सुविधेमुळे क्षयरोगाचे अचूक निदान होऊन रुग्ण औषधसंवेदनशील की MDR-TB हे स्पष्ट केले जाते. पात्र रुग्णांना तातडीने ‘BPaLM’ उपचार सुरू करण्यात येतात. तपासणी व उपचार पूर्णतः मोफत दिले जात आहेत.
‘BPaLM’ उपचारपद्धतीची ठळक वैशिष्ट्ये अशी
उपचार कालावधी : ६ महिने (पूर्वी १८–२० महिने),
औषधे : ४ (पूर्वी ५),अधिक परिणामकारक व रुग्णस्नेही प्रणाली आहे. कावेरी या रुग्णालय ‘BPaLM’ उपचार पूर्ण केले असून, आशाताई वैशाली आयवळे यांच्या पाठपुराव्यामुळे उपचार नियमित झाले. आणखी तीन रुग्णांनीही उपचार पूर्ण केले आहेत. या यशस्वी अंमलबजावणीबद्दल आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
“क्षयरोगाला घाबरून न जाता, त्याची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित जवळच्या नागरी आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी. वेळेवर निदान व पूर्ण उपचार घेतल्यास क्षयरोग नक्कीच बरा होऊ शकतो,” असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, उपायुक्त आशिष लोकरे, आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने व शहर क्षयरोग अधिकारी डॉ. अरुंधती हराळकर यांनी संयुक्तपणे केले आहे.


















