जेऊर – जिल्हा परिषद सोलापूर शिक्षण विभाग, पंचायत समिती करमाळा व नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, केत्तूर-२ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २३ व २४ डिसेंबर २०२५ रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या विज्ञान प्रदर्शनात करमाळा तालुक्यातील प्राथमिक स्तरावरील १६० तसेच माध्यमिक स्तरावरील ४८ विज्ञान प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. या स्पर्धेत श्री राजेश्वर विद्यालय, राजुरी येथील विद्यार्थी पृथ्वीराज दत्तात्रय दुरंदे व यशराज समीर कामटे यांनी इयत्ता नववी व बारावी या गटात नावीन्यपूर्ण व उपयुक्त प्रकल्प सादर करून प्रथम क्रमांक पटकावला.
या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे विज्ञान विषयतज्ज्ञ व मार्गदर्शक प्रा. अमोल सोपान कोल्हे यांचे मोलाचे व अनमोल मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल दोन्ही विद्यार्थ्यांचा स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संचालक मा. कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या उल्लेखनीय कामगिरीमुळे विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे.
या उज्ज्वल यशाबद्दल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली कोल्हे, वैजनाथ स्वामी सेवा मंडळाचे संस्थापक सचिव मा. लालासाहेब जगताप, विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवृंद तसेच राजुरी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

























