पाच शतकांनंतर श्री रामलल्ला विराजमान होत आहेत. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात येत आहेत. त्यामुळे भाजपमध्ये येण्यासाठी तयार असलेल्यांना पक्षात आणा. कार्यक्रमाला जिल्ह्यातून ५५ हजार लोकांना आणा. यासह पंचसूत्रींची पंतप्रधान मोदी यांना गिफ्ट द्या, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.लोकसभा निवडणूक व पंतप्रधान मोदी यांच्या सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर येथील पोलिस कल्याण केंद्रात ते सुपर वॉरिअर्सशी संवाद साधत होते.
बावनकुळे म्हणाले, भाजपला मत देणारा प्रत्येक मतदार रे नगरच्या कार्यक्रमाला यावा. त्यात महिलांची संख्या ५० टक्के राहील, या दृष्टीने प्रयत्न करावेत.तसेच २२ जानेवारीला शहरवासियांना विक्रमी संख्येने आनंदोत्सव साजरा करता येईल, यासाठी सार्वजनिक ठिकाणी एका कार्यक्रमाचे आयोजन करावे. यावेळी छायाचित्र, व्हिडिओ शुटिंग करण्यास मनाई होती. याप्रसंगी खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, आमदार सुभाष देशमुख, विजय देशमुख, समाधान आवताडे, अमर साबळे, जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, शहराध्यक्ष नरेंद्र काळे आदी उपस्थित होते.




















