पुणे – प्रत्यक्षात लोकशाही यंत्रणा अंमलात आणण्यासाठी निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. मतदारांना त्यांचे सरकार निवडण्याच्या अधिकाराची अंमलबजावणीसाठी कार्यरत राज्य निवडणूक आयोगाचा कारभार मात्र संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पारदर्शकता अभावी आयोगाने मतदारांचा विश्वास गमावला आहे, अशा शब्दात बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव,पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी गुरूवारी (ता.४) आयोगाच्या कारभारावर ताशेरे ओढले.
अगोदर ‘व्हीव्हीपॅट’ मशीन न वापरण्याचा आणि आता निवडणूक निकाल पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाच्या अकार्यक्षमतेकडे बोट दाखवणारा आहे. आयोगाने आतापर्यंत जाहीर केलेल्या वेळा पाळलेल्या नाही. राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाची मर्यादा ओलांडली जात असतांना आयोगाने याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे होते. असे न करता आयोगाने आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली असतांना देखील निवडणुका जाहीर केल्या. मुद्दा न्यायप्रविष्ठ झाल्यानंतर ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत आयोगाने हा मुद्दा न्यायालयावर सोडल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.
आयोगाचे हे वर्तन मतदारांसह राजकीय पक्ष, उमेदवार आणि प्रत्यक्षात निवडणुकीच्या अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची नाराजी ओढावणारे असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले. नागरिकांच्या घटनादत्त मतदान अधिकाराची अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोगाचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. अशात आयोगाकडून निवडणुकीच्या तारखेत वारंवार बदल करने, मतदार यादीसंदर्भात कुठलीही ठोस भूमिका न घेणे, निवडणुकीचे निकाल पुढे ढकलने या सारखे निर्णय असंवैधानिक वाटतात. आयोगाचे वर्तन योग्य नसून सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली ते काम करीत असल्याचे यावरून अधोरेखित होत असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.


























