जालना – बदनापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून घाणीचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा, बसस्थानक परिसर आणि वस्ती भागांमध्ये सर्वत्र कचऱ्याचे ढिग साचलेले दिसत आहेत. नगरपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे शहरातील स्वच्छतेची दयनीय अवस्था झाली आहे.
साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, डास-माशांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शहरात साथरोगांचा धोका निर्माण झाला आहे. लहान मुले व वृद्ध नागरिकांना या अस्वच्छ वातावरणाचा सर्वाधिक त्रास होत आहे.
शासनाकडून स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगरपंचायतीला दरवर्षी लाखो रुपयांचा निधी मिळतो, मात्र तो प्रत्यक्षात कुठे खर्च होत आहे असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
नागरिकांचा इशारा — “जर त्वरित स्वच्छतेची योग्य व्यवस्था करण्यात आली नाही, तर आम्ही आंदोलनाचा मार्ग अवलंबू,” असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.
प्रशासनाने तातडीने लक्ष घालून शहर स्वच्छ करावे व निष्काळजी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.




















