नवीन नांदेड प्रतिनिधी
पंकज नगर येथे चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील रोख ५ हजार रुपयांसह सुमारे लाख रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना २८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली . १ मार्च रोजी दुपारी साडेचार वाजेचेदरम्यान, पंकजनगर धनेगाव घडली असून, याप्रकरणी नांदेड ग्रामीण ठाण्यात ३ मार्च रोजी गुन्हा नोंदविण्यात आला.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंकजनगर, धनेगाव येथील रहिवासी राहूल गोणे तसेच त्यांचे कुटुंबीय २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजेदरम्यान, माळाकोळी येथे गेले. दरम्यान, राहूल गोणे यांच्या घरातील सर्व मंडळी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी २८ फेब्रुवारीच्या रात्री ते १ मार्च रोजी दुपारी साडेचार वाजेदरम्यान, गोणे यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश मिळवला. त्याचवेळी चोरट्यांनी गोणे यांच्या घरातील पलंगाच्या बॉक्समध्ये ठेवलेल्या डब्यातील रोख ५ हजार रुपयांसह सोन्या- चांदीचे दागिने असा एकूण एक लाख रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.
चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये ७ ग्रॅम सोन्याचे झुमके, २ ग्रॅम सोन्याची नथ, अर्धा ग्रॅमची अंगठी, १ ग्रॅमचे गळ्यातील पान, अर्धा ग्रॅमचे कानातले पान तसेच चांदीची अंगठी, बिंदल्या, कोपऱ्या, कमरेची साखळी, पायातील वाळे व चैन असे एकूण सुमारे एक लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिन्यांचा समावेश असल्याचा उल्लेख राहूल गोणे यांनी दिलेल्या तक्रारीत असल्याची माहिती पोलीस ठाणे अंमलदार शंकर नलबे व मदतनीस अंमलदार तुकाराम नागरगोजे यांनी दिली.
याप्रकरणी राहूल पुंडलिक गोणे यांच्या तक्रारीआधारे नांदेड ग्रामीण ठाण्यात ३ मार्च रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांचे मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार हरिश मांजरमकर व त्यांचे सहकारी कर्मचारी याप्रकरणाचा तपास करीत आहेत.