छत्रपती संभाजी नगर – कन्नड बसस्थानक परिसरात चोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. शनिवारी (दि. १) दुपारी दोनच्या सुमारास बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी एका महिलेचे दीड ग्रॅम सोन्याचे मणी-मंगळसूत्र लंपास केले.
शहरात आणि बसस्थानक परिसरात दिवाळीनंतरपासून मंगळसूत्र चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याने महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात कामानिमित्त फिरणाऱ्या महिलांनाही असुरक्षिततेची भावना वाढू लागली आहे.
या घटनेत शितल रवींद्र वाडेकर या महिलेने धाडस दाखवत कन्नड शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्या कन्नड ते चिंचोली लिंबाजी या बसमध्ये चढताना त्यांच्या गळ्यातील मणी-मंगळसूत्र गायब झाल्याचे लक्षात आले. तत्काळ बसमधून खाली उतरून त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
तक्रार दाखल झाल्यानंतर कन्नड शहर पोलिसांनी दोन संशयित महिला आणि एका अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार नासेर पठाण करत आहेत.
स्थानिक नागरिक आणि महिला प्रवाशांनी बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे वाढवावेत तसेच पोलिसांनी गस्त मजबूत करावी, अशी मागणी केली आहे




















