सोलापूर : महापुरात खरडून गेलेल्या जमिनी आणि बुजलेल्या विहिरीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारकडून खरडून गेलेल्या जमिनी आणि बुजलेल्या विहिरीसाठी नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. खरडून गेलेल्या जमिनींचे आणि बुजलेल्या विहिरींचे जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे सुरू झाले असून महिनाअखेर पर्यंत पंचनामा अहवाल तयार होणार आहे.
विहीरी व खरडलेल्या जमीनींच्या पंचनाम्यांसाठी मंडल अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली पथक नियुक्त करण्यात आले आहे. त्या-त्या गावांचे कृषी सहायक, ग्रामविकास अधिकारी, ग्राममहसूल अधिकारी, बांधकाम व जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता यांचा या पथकामध्ये समावेश आहे. तालुका कृषी अधिकाऱ्यांचे या पथकावर नियंत्रण असणार आहे. याशिवाय अतिवृष्टी व महापुरात पशुधनाला बसलेला फटका, पशुधनाचा झालेला मृत्यू याचीही माहितीही पशुसंवर्धन विभागाकडून संकलित केली जात आहे.
महापूर व अतिवृष्टी बाधितांना टप्प्याटप्प्याने मदत थेट बँक खात्यावर दिली जात आहे. अतिवृष्टी, महापुराचे पाणी घरात शिरलेल्यांना पहिल्या टप्पात प्रत्येकी दहा हजारांची मदत देण्यात आली आहे . खरडून गेलेल्या जमिनीपोटी व बुजलेल्या विहिरीपोटी मदत दिली जाणार आहे. ऑक्टोबरअखेर पंचनामे पूर्ण करून सोलापूर जिल्ह्याचा एकत्रित अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे.
…
बुजलेल्या विहिरींचे पंचनामे करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले असून पंचनाम्यांचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे. नुकसानीचा पंचनामे साधारणतः महिना अखेरपर्यंत पूर्ण होतील. त्यानंतर जिल्ह्यातील बुजलेल्या विहिरींचे नुकसान स्पष्ट होणार आहे .
कुलदीप जंगम, मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद, सोलापूर


















