तभा वृत्तसेवा माहूर,दि.०३ मार्च
: महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने राज्यात शेतकरी माहिती संच निर्मितीची अंमलबजावणी केली जात आहे.अनेक योजनांचा लाभ शेतकरी माहिती संच प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.एकाच नोंदणी मध्ये सर्व सरकारी योजनांचा सहज लाभ,डिजिटल पीक कर्ज, पीक विमा, हमीभाव खरेदी या व इतर सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेत नाव नोंदणी करून घेणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने शेतकरी माहीती संच नोदणी करणे सुलभ व्हावे म्हणून सोमवार दि ०३ मार्च रोजी माहूर शहरातील कपिलेश्वर धाम येथे तहसीलदार किशोर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी नाव नोंदणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्ष फिरोज दोसानी निवासी तहसीलदार डॉ.राजकुमार राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यास ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी शेतकरी ओळख क्रमांक काढणे अनिवार्य आहे. यापुढील काळात शेतकऱ्यांना पी.एम. किसान योजना, पीक विमा, नैसर्गीक आपत्ती अनुदान, पिक कर्ज व इतर कोणत्याही शासकीय योजनाचा लाभ घेण्यासाठी ही नोंदणी करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने शेतकरी बांधवांची माहीती सकंलन करण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार माहुर तालुक्यात ॲग्रीस्टॅक योजने अंतर्गत शेतकरी नोंदणी करून घेण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले.
शासन निर्णयान्वये केंद्र शासनाच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲग्रीकल्चर अंतर्गत ॲग्रीस्टॅक हा प्रकल्प संपूर्ण राज्यात राबविण्यात येत असून, त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने दिनांक१४/१०/२०२४ रोजी शासन निर्णय पारित केलेला आहे. ॲग्रीस्टॅक संकल्पने अंतर्गत तीन पायाभूत माहिती संच तयार करण्यात येणार आहेत. त्यात शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (Farmers Registry), हंगामी पिकांचा माहिती संच (Crop Sown Registry) व भू-संदर्भिकृत भूभाग असणारे गाव नकाशे यांचा माहिती संच (Geo-Referenced Land Parcel Cadastral Map) तयार करणे ह्या तीन बाबींचा समावेश असणार आहे.
त्यासाठी पथक नियुक्त करण्यात आले असून,नियुक्ती आदेश प्राप्त झाल्यावर ज्या गावांना कॅम्प करावयाचा आहे. तेथील परिस्थितीनुसार कॅम्पसाठी चांगली इंटरनेट कनेक्टिविटी असणारी जागा निश्चित करून गावकऱ्यांच्या मदतीने कॅम्प उभारणे, यासाठी ग्राम विकास अधिकारी ग्रामपंचायती मार्फत सुयोग्य जागा उपलब्ध करून द्यावी.शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती निर्मितीमध्ये पथकातील कर्मचारी सर्वात महत्वाची भुसिका पार पाडत असून,प्रशिक्षणादरम्यान ही बाब विचारात घेऊन सर्व पथक सदस्यांनी परिपूर्ण प्रशिक्षण घेणे व आलेल्या सर्व शंकाचे निरसन करून देण्यासाठी प्राथमिक जबाबदारी पार पाडणे,
मोहिम राबविणेबाबत संबंधीत गावाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील रेशन दुकानदार व गावातील प्रतिष्ठीत नागरिक यांचे माध्यमातून सर्व गावकऱ्यांना कॅम्पबाबत माहिती देणे,शेतकरी ओळख क्रमांक निर्मिती करताना करावयाच्या आधार जोडणीसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक त्यांच्या आधार क्रमांकासोबत जोडला असल्याची खात्री करून घेणे,गावात आयोजित करण्यात येणा-या कॅम्पबाबत महसूल सेवका मार्फत दवंडी देणे,मोहिमेच्या एक दिवस अगोदर सायंकाळी पथकाने संबंधित गावामध्ये मुक्कामी जावे व गावात ग्रामसभा आयोजित करून ॲग्रीस्टैंक संकल्पना, त्याचे फायदे व पुढील तीन दिवस (छोटया गावासाठी ही दिवस संख्या कमी असू शकते) आयोजित करण्यात येणाऱ्या कॅम्प बाबत ग्रामस्थांना माहिती देणे,
सदर कॅम्पच्या जनजागृतीबाबत आवश्यक विविध फलक सर्व लोकांना दिसतील अशा ठिकाणी गावात लावणे,गावातील जास्तीत जास्त शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्याची कार्यवाही पूर्ण करणे,Self-Mode व्दारे शेतकरी यांची http:/mhfr.agristack.gov.in/ या संकेतस्थळ वरून नोंदणी करणे बाबत मार्गदर्शन करणे ही कामे पथकाला ॲग्रीस्टॅक योजने अंतर्गत शेतकरी नोंदणी करुन फार्मर आयडी शेतकरी ओळख पत्र तयार करताना करावी लागणार असून, तहसीलदार यादव यांनी याबाबत पथकाला पत्राद्वारे निर्देश दिले आहेत.
ॲग्रीस्टॅक योजने अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक नोंदणीस सुरूवात झाली असून, तालुक्यातील जवळपास ३५ टक्के शेतकर्यांच्या नोंदी देखील झाल्या आहेत. उर्वरित शेतकऱ्यांची माहीती संच तयार करण्यासाठी तहसीलदार किशोर यादव यांच्या मार्गदर्शनात निवासी नायब तहसीलदार डॉ. राजकुमार राठोड, मंडळ अधिकारी एस.के. साळसुंदर, ग्राम महसूल अधिकारी सी.पी.बाबर, पवन यादव, साहेबराव गावंडे, शितल ठाकुलकर (राऊत) यासह सेतू सुविधा केंद्र चालक यांनी दि.०३ रोजी कपीलेश्वर धर्मशाळा येथे आयोजित कॅम्पमध्ये सहभाग नोंदवून शेतकऱ्यांची माहीती सकंलन करण्याचे कामास सुरुवात केली असून, यावेळी सोमवार या माहूर येथील आठवडी बाजाराच्या दिवशी बाजारासाठी शहरात आलेल्या तालुक्यातील विविध गावांतील अनेक शेतकऱ्यांनी सदरील कॅम्पमध्ये नोंदणी करून घेतली. तर,दि.०४ रोजी वाई बाजार व ०५ रोजी वानोळा येथे कॅम्प चे आयोजन करण्यात आले आहे. सदरील कॅम्प मध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली फार्मर आयडी तयार करुन घेण्याचे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे