सुस्ते – विद्यार्थ्यांमध्ये करिअरविषयक जाण वाढावी तसेच उदयोन्मुख तंत्रज्ञानाची माहिती ग्रामीण स्तरावर पोहोचावी या उद्देशाने पंढरपुर तालुक्यातील विविध शाळांमध्ये मराठवाडा मित्र मंडळ पॉलीटेकनिक, पिंपरी चिंचवड, पुणे, यांच्या वतीने करिअर मार्गदर्शन व तांत्रिक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात प्रा. ज्योतिराम रणदिवे आणि प्रा. नितीन गायकवाड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत अभियांत्रिकी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती दिली.सत्रात विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्स ,थ्रीडी प्रिंटिंग, ड्रोन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिक व्हेईकल टेक्नॉलॉजी व सायबर सिक्युरिटी यांसारख्या नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यात आली.तसेच दहावी–बारावीनंतर उपलब्ध असलेल्या पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम, कौशल्याधारित कोर्सेस यांची माहिती देऊन करिअर नियोजनाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले.
या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील संधी, रोजगाराच्या दिशा आणि आगामी दशकातील तांत्रिक मागणी याबाबत अनेक विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रश्न विचारले.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक जागरूकता आणि करिअरबाबत दिशा निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरल्याचे मत स्थानिक शिक्षकांनी व्यक्त केले.



















