तभा फ्लॅश न्यूज / जालना : भोकरदन तालुक्यातील नाफेड सेंटरमधील मोठ्या फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आले असून, शासनाने निश्चित केलेल्या प्रमाणापेक्षा अधिक सोयाबीन दाखवून आणि खोट्या सातबाऱ्यांच्या आधारे शासनाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी 21 जून 2025 रोजी पारद पोलीस ठाण्यात जिल्हा पणन अधिकारी विजय राठोड यांनी तक्रार दाखल केली होती. तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या नेतृत्वाखाली याप्रकरणाचा सखोल तपास करण्यात आला. तपासात एकूण 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे भोकरदन तालुकाध्यक्ष नवनाथ सुदाम दौड यांचे नाव आघाडीवर असून, त्यांचा भाऊ भागवत सुदाम दौड आणि आठ अन्य साथीदार हे प्रकरणात थेट सहभागी असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी 15 जुलै 2025 रोजी नवनाथ दौड याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला शुक्रवार (18 जुलै) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असून लवकरच मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.
गुन्ह्याचा स्वरूप –
आरोपींनी खोट्या दस्तऐवजांच्या आधारे नाफेडच्या शासकीय खरेदी केंद्रात अधिक उत्पादन दाखवले आणि त्यामुळे शासनाच्या शेतमाल खरेदी योजनेत लाखोंचा अपहार केला गेला. हे कागदपत्रे, सातबारे, आणि खरेदी नोंदी यांची खातरजमा केल्यानंतर फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.
स्थानिक राजकारणात खळबळ –
या अटकेमुळे भोकरदन तालुक्यात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एका प्रमुख राजकीय पक्षाच्या तालुकाध्यक्षावर गुन्हा दाखल झाल्याने स्थानिक राजकारणात त्याचे पडसाद उमटले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आणखी काही आरोपींना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी सांगितले की, दस्तऐवज, बँक व्यवहार आणि शासकीय रेकॉर्डची तपासणी सुरू असून हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे.