सोलापूर – भाजप नगरसेविका वनिता पाटील यांच्या अर्जामध्ये रहिवास नागाव, तालुका उरण, जिल्हा रायगड असा नमूद करण्यात आला होता. मात्र, चौकशीत त्या प्रत्यक्षात सलगर, तालुका अक्कलकोट येथील मूळ रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. रहिवासी पत्त्यासंदर्भातील ही विसंगती गंभीर स्वरूपाची मानून समितीने पनवेल विभागीय समितीमार्फत देण्यात आलेला ‘कोळी महादेव’ अनुसूचित जमातीचा दाखला रद्द करून तो जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २४-ब मधून अनुसूचित जमाती प्रवर्गातून निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेविका वनिता संतोष पाटील यांचा जातीचा दाखला रद्द करण्यात आला असून, तो जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोकण विभागीय अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने दि. २९ जानेवारी रोजी हा निर्णय दिला आहे. जातीच्या दाखल्यासाठी सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये चुकीची माहिती आढळून आल्याचा ठपका ठेवण्यात आला असल्याची माहिती माजी उपमहापौर राजेश काळे यांनी दिली.
महापालिका निवडणुकीसाठी वनिता पाटील यांनी दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणीसाठीचा प्रस्ताव सोलापूर येथील समितीकडे सादर केला होता. निवडणुकीनंतर नमुना ‘क’ मधील मूळ जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक असताना, त्यांनी माहेरच्या नावाने म्हणजेच ‘वनिता तलवार’ या नावाने अर्ज केल्याचे समितीच्या तपासणीत निष्पन्न झाले.या निर्णयामुळे महापालिका राजकारणात खळबळ उडाली असून, प्रभागातील नागरिकांमध्येही विविध चर्चा सुरू आहेत.
समितीने नगरसेविका वनिता पाटील यांना योग्य व सत्य रहिवासी माहिती नमूद करून नव्याने जातीचा दाखला मिळवण्यासाठी अर्ज करण्याची मुभा दिली आहे. याप्रकरणाबाबत पुढील कायदेशीर प्रक्रिया काय होणार, तसेच महापालिकेतील त्यांच्या सदस्यत्वावर याचा काय परिणाम होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सी फॉरमॅटमध्ये प्रमाणपत्र पडताळणी समितीला सादर करण्यात येणार आहे.
कमिटीच्या आदेशामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. सदर प्रकरणाची गुणवत्ता कायम ठेवून नव्याने सी फॉरमॅटमध्ये प्रमाणपत्र संबंधित पडताळणी समितीला सादर करावा त्या पद्धतीने आम्ही पुरतता करून देऊ
– वनिता संतोष पाटील

















