तभा वृत्तसेवा
माहूर,दि.२० नोव्हेंबर
: सारखणी ते माहूर राष्ट्रीय महामार्गावरील वाई बाजार ते साईनगर फाट्याच्या मधोमध राष्ट्रीय महामार्गावर आज बुधवार दि.२० रोजी दु.२ वा.च्या सुमारास बस व दुचाकीच्या भिषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची धक्कादायक दूर्दैवी घटना घडली. एकिकडे राज्यासह किनवट मतदारसंघात सर्वत्र विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना, घडलेल्या एका भिषण अपघाताच्या दुर्घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, दुपारी २ वा. च्या सुमारास सारखणी माहूर राष्ट्रीय महामार्गावरील वाई बाजार फाटा ते साईनगर दरम्यान हा अपघात झाला.नागपूर वरून किनवट बस क्र. एम.एच. ०६ एस.८५३२ येत होती. त्याचवेळी आसोली येथील फुलसिंग गुलाब चव्हाण वय ४३ हा वाई बाजार कडून साईनगर च्या दिशेने जात होता.
यावेळी सदरचा अपघात झाला. झालेला अपघात एवढाभिषण होता की बसने दुचाकीला अक्षरशः ५० फुटांपर्यंत फरफटत नेल्याची प्रत्यक्ष परिस्थितीवरून दिसून येत असून, दुचाकीचालक फुलसिंग गुलाब चव्हाण याचा घटनास्थळावरच मृत्यू झाला.
सदरचा मयत इसम हा वाई बाजार येथील एका प्रतिष्ठीत व्यापाऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून कामाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहीती मिळताच सिंदखेड पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. अपघाताच्या घटनेची पुढील पोलीस प्रक्रिया सुरू असल्याने वृत्त लिहीपर्यंत याबाबत अधिकची माहिती प्राप्त होऊ शकली नाही.