वेळापूर – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती तसेच आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वेळापूर पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीचे पदाधिकारी, शिवजयंती उत्सव मंडळांचे पदाधिकारी व पोलीस पाटील यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीस वेळापूर पोलीस ठाणे हद्दीतील मौजे खंडाळी, पिसेवाडी, निमगाव, तोंडले, बोंडले, मळोली, तांदुळवाडी व कोळेगाव येथील शिवजयंती उत्सव समितीचे सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आशिष कांबळे म्हणाले की, “शिवजयंती डॉल्बी व डीजे मुक्त पद्धतीने साजरी करावी.” तसेच आक्षेपार्ह देखावे अथवा बॅनर लावू नयेत, देखावे मर्यादित उंचीचे असावेत, मिरवणुका वेळेत सुरू करून वेळेतच समाप्त कराव्यात, जयंतीनंतर लावलेले झेंडे व बॅनर तात्काळ काढावेत, अशा सूचना दिल्या.
“सर्व मंडळांनी प्रशासनास सहकार्य करून शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने शिवजयंती साजरी करावी. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनीही सहकार्य करावे,” असे आवाहन प्रभारी अधिकारी आशिष कांबळे यांनी यावेळी केले.
बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही शांतता राखून, नियमांचे पालन करत शिवजयंती साजरी करण्याची ग्वाही दिली.
—————————————
कोट….
शिवजयंती उत्सव काळामध्ये मिरवणुकीमध्ये नियमांचे पालन न करता जर कोणी डि जे अथवा डॉल्बी लावण्याचा प्रयत्न केल्यास तो डी जे जप्त करून त्या मंडळावर कायदेशीर कारवाई केली जाईल . मंडळांनी मिरवणुकीमध्ये पारंपारिक वाद्याचा वापर करावा
—: आशिष कांबळे
वेळापूर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी

























