छत्रपती संभाजीनगर, 21 जून (हिं.स.) : येथील महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे ३०० महिलांना हिमरू शाल निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले. या महिलांना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. प्रशिक्षित महिलांनी यशस्वी उद्योजक व्हावे, अशा शब्दात जिल्हाधिकारी स्वामी यांनी महिलांना प्रोत्साहन दिले.
या प्रशिक्षण कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर, पैठण, विहामांडवा येथील एकूण ३०० महिलांनी प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, प्रशिक्षण घेतल्याचा फायदा घ्यावा व आपला स्वतःचा उद्योग उभारावा. यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत तसेच बँकिंगस्तरावरील मार्गदर्शन करण्यात येईल. उद्योग उभारल्यानंतर विक्री आणि दर्जात्मक उत्पादन यावर लक्ष द्यावे. उद्योगातील स्पर्धेत ह्याच बाबी आवश्यक आहेत. या जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा असून हिमरू शाल निर्मिती करुन शालीची व जिल्ह्याची ख्याती सर्वदूर पोहोचवावी, असेही त्यांनी सांगितले.