मुंबई, १५ जुलै (हिं.स.) : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांची अचानक भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. भुजबळ यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. ही भेट ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या वादावर चर्चा करण्यासाठी असावी, असे बोलले जात आहे.
भुजबळांनी पवारांना राज्यातील वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली आणि उपोषण करणाऱ्यांना उपोषण सोडण्याची सूचना दिली.
यावर भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यात ओबीसींना आरक्षण देण्याचं काम तुम्ही राबवलं आणि आता राज्यात काही जिल्ह्यात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक मराठा समाजाच्या हॉटेलात जात नाही. काही लोक ओबीसी, धनगर आणि वंजारी आणि माळी समाजाच्या दुकानात मराठा समाज जात नाही. अशी परिस्थिती झाली आहे. राज्यातील ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे, ही शांतता निर्माण झाली पाहिजे, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, मी आज शरद पवार साहेबांकडे सकाळीच गेलो होतो. त्यांची वेळ घेतली नव्हती. ते आजारी असल्याचं कळलं होतं. सव्वा दहा वाजता गेलो होतो. ते तब्येत बरी नसल्याने झोपले होते. त्यामुळे मी एक दीड तास थांबलो. ते उठले आणि मला बोलावलं. ते बिछान्यावरच झोपलेले होते. तब्येत बरी नव्हती. मी बाजूला खुर्ची ठेवून बोलत होतो. दीड तास चर्चा केली. मी कोणतंही राजकारण घेऊन आलो नाही. मंत्री आणि आमदार म्हणून आलो नाही. पक्षीय भूमिका नाही, असं छगन भुजबळ म्हणाले.
भाजप, शिंदे गटातून प्रतिक्रिया
दरम्यान भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी या भेटीचा संबंध महायुतीला धक्का देणाऱ्या कोणत्याही निर्णयाशी जोडलेला नाही असे स्पष्ट केले. प्रवीण दरेकर यांनी या भेटीच्या उद्देशाबद्दल कोणतीही माहिती नाकारली आहे. शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी या भेटीमागील राजकीय कारण असावे, असे सूचित केले आहे.