अकलूज – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर येथे भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण विद्यालय परिसर आकर्षक फलकांनी व रांगोळ्यांनी सजला होता. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर तेजस्वी भाव व मनामध्ये शिवप्रेमाची अखंड ज्योत प्रज्वलित झालेली दिसून आली.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी सयाजीराजे मोहिते पाटील नगरसेवक अकलूज नगर परिषद, प्रमुख व्याख्याते सुहास उरवणे शिव व्याख्याते व इतिहास अभ्यासक, प्रशाला समिती सभापती अॅड नितीनराव खराडे उपस्थित होते.
सर्व मान्यवरांचे स्वागत महर्षि बाल वाद्य वृंदामार्फत स्वागत गीताने करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी शिवरायांचे नेतृत्व गुण ,संघटन कौशल्य आणि स्त्री सन्मानाची भूमिका यांचा विशेष उल्लेख केला .त्यांनी विद्यार्थ्यांना शिवचरित्रातील प्रेरणादायी मूल्य आत्मसात करून समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व अखंड हिंदुस्तानचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या शुभहस्ते अभिवादन करण्यात आले. संकुलाच्या वतीने सर्व मान्यवरांचा सन्मान समारंभ पार पडला.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात जिल्हास्तरावर प्रशालेने प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल मुख्याध्यापक संजय गळीतकर यांचा सन्मान प्रमुख अतिथी सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
संकुलातील विद्यार्थिनी भूमिका कारमकर ,अल्फिया सय्यद ,काव्या सावंत,शांभवी पाठक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.
विविध स्पर्धांमध्ये नैपुण्य प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या शुभ हस्ते पार पडला.
प्रमुख व्याख्याते सुहास उरवणे शिवव्याख्याते इतिहास अभ्यासक यांनी आपल्या व्याख्यानात सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेला तेजपुंज सूर्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वात असलेली धैर्याची धार व दूरदृष्टीची खोली याविषयी उल्लेख केला. रायगडावर झालेला राज्याभिषेक सोहळा म्हणजे स्वाभिमानाच्या पूर्व जन्माचा सोहळा होता असे सांगितले.
कार्यक्रमासाठी शुभम राजमाने, प्रशाला समिती सदस्य कैलास चौधरी, अनिल जाधव ,विनोद जाधव, नितीन इंगवले देशमुख, उपमुख्याध्यापक असिफ झारेकरी, पर्यवेक्षक उमेश बोरावके उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी गायकवाड यांनी केले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम ,शौर्य आणि स्वाभिमानाची भावना अधिक दृढ झाली .अशा उत्साहपूर्ण वातावरणात शिवजयंती सोहळा संपन्न झाला.

























