तभा फ्लॅश न्यूज/पंढरपूर : संत परंपरेच्या पवित्र भूमीत आज एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला, जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री संत नामदेव महाराज यांच्या 675 व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त पंढरपुरात भेट देत नामदेव पायरीचे विधिवत दर्शन घेतले आणि महाआरती केली. या पावन प्रसंगी त्यांनी संत चोखामेळा समाधीस्थळासह श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचेही दर्शन घेतले.
या धार्मिक कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांना शाल आणि विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली.
कार्यक्रमाला पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, गोपीचंद पडळकर, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे सदस्य, तसेच संत नामदेव महाराजांचे वंशज व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली आणि माहिती जाणून घेतली. “संत नामदेव हे भागवत धर्माचे जागतिक प्रतीक होते. त्यांनी वारकरी विचारधारा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली. त्यांच्या विचारांचा व्यापक प्रसार आजच्या समाजासाठी अत्यंत गरजेचा आहे,” असे ते म्हणाले.