तभा फ्लॅश न्यूज/धाराशिव : उमरगा तालुक्यातील दाळींबजवळील शिवाजी नगर तांडा येथे दोन चिमुकल्यांचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. खेळत असताना पाय घसरून पाण्यात पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
या दुर्घटनेत सुशांत योजक बाळु चव्हाण (वय ५) आणि प्रमोद प्रकाश चव्हाण (वय ८) या दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. हे दोघे आपल्या मातांसोबत शेतात गेले होते. कामात गुंतलेल्या मातांच्या नजरेआड हे दोघे पाझर तलावाशेजारी खेळत असताना पाय घसरून थेट पाण्यात पडले. पाण्याचा अंदाज न आल्याने काही क्षणातच दोघेही बुडाले.
मुले दिसत नसल्याने त्यांच्या मातांनी शोध घेतला. अखेर तलावाच्या पाण्यावर एका मुलाचा शर्ट दिसून आल्याने शंका आली. लगेच ग्रामस्थांच्या मदतीने दोघांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले. तातडीने त्यांना दाळींब येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना येणेगूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. दुर्दैवाने येणेगूर येथे दोघांनाही मृत घोषित करण्यात आले.
या घटनेने शिवाजी नगर तांडा परिसरात शोककळा पसरली असून, गावकऱ्यांनी या दुर्घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. दोन निष्पाप जीवांचे असे अचानक जाणे हे कुटुंबियांसाठी आणि समाजासाठी फार वेदनादायक आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.